ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती मराठा विद्यार्थ्यांनाही लागू कराव्यात – प्रा. रामदास झोळ यांचे निवेदन

केम(संजय जाधव) : इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही मिळाव्यात, अशी मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग,विशेष मागास प्रवर्ग या घटकातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर मॅपिंग करण्यात आलेले आहे परंतु मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅपिंग करण्यात आलेले नाही.
तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांने व्यावसायिक अभ्यासक्रम अगेन्स्ट कॅप कोट्यातून प्रवेश घेतलेला आहे, त्याच्या पालकांचे एकत्रित उत्पन्नही दीड लाख पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सवलत मिळते परंतु मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सवलत मिळत नाही.
अशा प्रकारे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही मिळाव्यात अशी मागणी झोळ यांनी केली.
याचबरोबर प्रा. झोळ यांनी, 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी SEBC व OBC विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, यासंदर्भात शासनाने तात्काळ जीआर काढावा, अशी मागणी केली.

या निवेदनातील दोन्ही मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत “जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ तसेच इतर सवलतींचा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल,” असे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.



