करिअरसाठी मुलींनी भारतीय पोलीस सेवेस प्राधान्य द्यावे – आयपीएस अंजना कृष्णा

करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त करमाळा येथे आयोजित शालेय चित्रकला व निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात आयपीएस अंजना कृष्णा यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये भारतीय पोलीस सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

हा उपक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, करमाळा व यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशकल्याणी सेवाभवन, करमाळा येथे पार पडला. तालुक्यातील विविध शाळांमधील पाचवी ते दहावीच्या दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

अध्यक्षीय भाषणात अंजना कृष्णा म्हणाल्या की, “करिअरसाठी विविध पर्याय उपलब्ध असले तरी भारतीय पोलीस सेवेला विशेष स्थान द्यायला हवे. विशेषतः मुलींनी या क्षेत्रात मोठ्या संख्येने यावे. आजही या सेवेत केवळ 12 टक्के महिला अधिकारी आहेत, जे खूपच कमी आहे. पालकांशी संवादाअभावी अनेक मुली या क्षेत्रापासून दूर राहतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मुलींनी माझ्याशी निःसंकोच संपर्क साधावा,” असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी केले. “सद्यस्थितीत पोलिसांवर मोठ्या जबाबदाऱ्या येऊन ठेपल्या आहेत. त्यांच्या प्रतिमेला उंचावण्यासाठी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची गरज आहे. यासाठी आमच्या संस्थेतर्फे सहकार्य केले जाईल,” असे ते म्हणाले.

प्रमुख पाहुणे डॉ. प्रचिती पुंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर संदेश दिला. त्यांनी सांगितले की, “समाजरक्षणाची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असून नीतिमान समाज घडविण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.” सहा. पो.निरीक्षक गिरीजा म्हस्के यांनीही मनोगत व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पो. कॉ. गणेश गुटाळ यांनी केले.
कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेले मान्यवर..आयपीएस अंजना कृष्णा, सहा. पो.निरीक्षक गिरीजा म्हस्के, निर्भया पथकाचे पो. कॉ. संभाजी पवार, पो. कॉ. गणेश गुटाळ, म. पो. कॉ. विद्या इंगोले, पो. कॉ. मनजीत भोसले, पो. कॉ. सनी सातव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रा. बाळकृष्ण लावंड, प्रा. कल्याणराव साळुंके, प्रा. जयेश पवार, प्रा. विष्णू शिंदे, अतुल दाभाडे व प्रा. निवृत्ती बांडे यांचाही गौरव झाला.
विजेते विद्यार्थी…निबंध स्पर्धा (इ. 8 वी ते 10 वी)
वैष्णवी प्रवीण पवार – दि. बागल विद्यालय, कुंभेज
ज्ञानदा घाडगे – न. जगताप विद्यालय, झरे
वैष्णवी राऊत – सुराणा विद्यालय, चिखलठाण
उत्तेजनार्थ : आर्यन गुळमे (जेऊर), हर्षाली ढेरे (वीट), प्रतिज्ञा भोसले (करमाळा)
चित्रकला स्पर्धा (इ. 5 वी ते 7 वी)
ईशान शेख – वामनराव बदे विद्यालय, उमरड
जकिया शेख – छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट
आरोही जाधव – छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट
उत्तेजनार्थ : अनुष्का बोराटे, स्नेहल राऊत (झरे), स्वरा कुंभार (पांडे)

