स्व.सुखदेव साखरे सरांचा आदर्श कार्याचा गौरव – “आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” प्राचार्य अंबादास पांढरे यांना प्रदान

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.30: राजुरी येथील
श्री.राजेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स्व.सुखदेव साखरे सरांनी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आदर्श निर्माण केला, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम.के. इनामदार (अश्विनी हॉस्पिटल, अकलूज) यांनी काढले.

स्व.साखरे सरांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त राजेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित “स्व.सुखदेव साखरे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार – २०२५” हा पहिला पुरस्कार जुळे (सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास कृष्णाथ पांढरे यांना प्रदान करण्यात आला.

ह.भ.प.एकनाथ महाराज हंडे यांच्या हस्ते रोख रु. ११ हजार, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन पांढरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार संजय मामा शिंदे ,वसुंधरा कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी देशमुख, विद्याविकास मंडळाचे सचिव विलास घुमरे, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. रामदास झोळ, दिग्विजय बागल, लालासाहेब जगताप, सरपंच राजेंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.


पुरस्कार संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी प्रास्ताविक करून या पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. प्राचार्य पांढरे यांनी उत्तरपर भाषणात म्हटले की, “साखरे सरांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यावरील जबाबदारी वाढवणारा असून तो सन्मान संस्मरणीय आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत साखरे यांनी केले तर नंदकुमार जगताप यांनी मानपत्राचे वाचन केले. आभार तुकाराम जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश मोरे, देवानंद सारंगकर, प्रवीण व नानासाहेब साखरे, विठ्ठल देशमुख, कुंडलीक साखरे, रावसाहेब जाधव, अशोक कचरे आदींनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


