700 विकलांग विद्यार्थ्यांची तिरुपती बालाजी मोफत देवदर्शन यात्रा

करमाळा(ता.5): श्री अष्टोधरा शत:108 चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट, हैदराबाद व वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विकलांग बांधवांसाठी भव्य अशी मोफत श्री तिरुपती बालाजी देवदर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

ही यात्रा दिनांक 9 सप्टेंबर 2025 ते 13 सप्टेंबर 2025 या कालावधीत सोलापूर येथून सुरू होणार असून, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील प्रमुख शहरांतील एकूण 700 विकलांग विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

सोलापूर येथील भैरूरतन दमाची शाळेतील 63 विकलांग विद्यार्थी सुद्धा या यात्रेत सहभागी होणार आहेत. सर्व यात्रेकरूंना सोलापूर ते तिरुपती आणि परतीचा प्रवास पूर्णपणे मोफत राहणार आहे. याशिवाय तिरुमला तिरुपती येथे राहण्याची, दर्शनाची, प्रवासाची आणि जेवणाची सोयही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना श्री अष्टोधरा शत:108 चुक्ला चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा श्री वेणु कुमार जी चुक्ला, तसेच वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्टचे लक्ष्मण बुधवंत, रणजित नलवडे, अतुलराजे जाधव,शिवाजी दादा वणवे, डॉ. योगेश पाटील, गणेश गावडे पाटील व राहुल वनारसे यांनी सांगितले की, ही यात्रा विकलांग विद्यार्थ्यांसाठी श्रद्धा, समाधान आणि प्रेरणा देणारी ठरेल.




