एका बाजूला दुग्धाभिषेक, तर दुसऱ्या बाजूला यूपीएससीकडे चौकशीची मागणी

करमाळा : करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा या कुर्डू (ता. माढा) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरूम उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्यात झालेल्या संभाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर स्थानिक मराठी न्यूज चॅनेल पासून राष्ट्रीय हिंदी,इंग्रजी न्यूज चॅनल्सवर या संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्या.
या व्हिडिओनंतर ‘मै तुमपे ऍक्शन लुंगा, इतनी डेअरिंग तुम्हारी’ या अजित पवार यांच्या वाक्यावरून नेटकऱ्यांनी कमेंट्स मध्ये त्यांच्यावर टिकेचा भडीमार केला आहे. अनेकांनी अंजना कृष्णाना सपोर्ट करत असलेले सोशल मीडियावर स्टेटस ठेवले आहेत. सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्ष नेत्यांकडून देखील पवारांवर टीका करण्यात येत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पवार समर्थकांनी मात्र अजित पवार यांची बाजू घेतली आहे. “उपमुख्यमंत्री कोण आहेत हे अधिकाऱ्यांना माहिती नसणे चुकीचे आहे”. अजित पवार काहीही चुकीचे बोलले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.

एका बाजूला दुग्धाभिषेक, तर दुसऱ्या बाजूला यूपीएससीकडे चौकशीची मागणी
दरम्यान, जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमाळ्यातील कमला भवानी मंदिरासमोर अंजना कृष्णा यांच्या डिजिटल छायाचित्राचा दुग्धाभिषेक करून त्यांना समर्थन दर्शविले. तर राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे अंजना कृष्णा यांचे शैक्षणिक व इतर कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

यावेळी बोलताना अतुल खूपसे-पाटील म्हणाले अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी कॉल केला यामुळे अधिकाऱ्यात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे अंजना कृष्णा या केरळ राज्यातील आहेत आपल्यातील मुलगी केरळमध्ये जाऊन नोकरी करत असेल सेवा करत असेल आणि तेथील उपमुख्यमंत्री तिला दमबाजी करत असेल तर आपल्याला किती वाईट वाटेल म्हणून अजित दादांनी या लाडक्या बहिणीची माफी मागावी आणि त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून जनशक्ती संघटनेच्या वतीने हे पाऊल उचलले आहे.

विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसेवा आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
अंजना कृष्णा आय.पी.एस. यांनी सादर केलेल्या शैक्षणिक, जातप्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल तपासणी / सत्यापन करणे अत्यंत आवश्यक आहे. सादर केलेल्या कागदपत्रे व माहितीसंदर्भात शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आयोगाच्या स्तरावरून सविस्तर चौकशी करून त्याची सत्यता निश्चित करण्यात यावी आणि संबंधित विभागांना आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी,
माध्यमांना बोलताना मिटकरी म्हणाले की, “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नाही असे सांगणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. शेतकऱ्यांना गुंड ठरवण्यापर्यंत मजल जाणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या कागदपत्रात घोळ असावा अशी शंका येते. तसेच अंजना कृष्णा यांना त्यांच्या पदाची ‘गुर्मी’ आली आहे असे म्हणत, अजित पवारांचे काहीही चुकलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

अजित पवार यांचे स्पष्टीकरण :
सोशल मीडिया आणि विविध चॅनेलवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व होणारे टिके नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर पांघरून घालण्यासाठी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले त्यात ते म्हणाले की –
कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला उद्देश नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.
आपल्या पोलिस दलाबद्दल, तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे.
माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वांत महत्त्वाचे आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक माध्यमांवर लिहिले आहे.


प्रकरण काय आहे?
31 ऑगस्ट रोजी माढा तालुक्यातील कुई येथे बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू असल्याची तक्रार मिळाल्यानंतर डीवायएसपी अंजना कृष्णा त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी उत्खनन
करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असता, स्थानिक राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून तो अंजना कृष्णा यांच्या हातात दिला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, अजित पवार यांनी फोनवरून अंजना कृष्णा यांना कारवाई
थांबवण्यास सांगितले. मात्र, अंजना कृष्णा यांनी फोनवर कोण बोलत आहे हे कसे कळणार?” असा प्रतिप्रश्न केला. यामुळे संतप्त झालेल्या अजित पवार यांनी आपली दोनदा ओळख करून दिली.
‘डीसीएम अजित पवार बोल रहा हूँ. ये
कार्यवाही बंद करो, मेरा आदेश है’ असे सांगितल्यानंतरही अंजना कृष्णा यांनी “मेरे फोन पर कॉल करें’ असे सांगितले, यावर अजित पवार संतापले आणि ‘तुमपे मै अॅक्शन लूंगा. इतनी डेरिंग है तुम्हारी. मेरा चेहरा तो पहचानोगी ना’ असे रागात
म्हणाले. ही व्हिडीओ सर्वत्र व्हायरलं झाली.
