थकीत ऊस बिलासाठी कंदर परिसरातील शेतकरी आक्रमक

कंदर(संदीप कांबळे): भोसे (ता. पंढरपूर) येथील कृषिराज गुळ पावडर कारखान्याकडून तब्बल 32 महिन्यांपासून ऊस बिल थकित आहे. येत्या 15 सप्टेंबर 2025 पर्यंतही पैसे न मिळाल्यास कारखान्याचे चेअरमन गणेश पाटील यांच्या घरासमोर शेतकरी सहकुटुंब उपोषणास बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

कंदर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य व रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी सांगितले की, 2022-23 च्या हंगामात करमाळा तालुक्यातील सातोली, पांगरे, वांगी व कंदर भागातील शेतकऱ्यांनी भोसे येथील कारखान्यास ऊस पुरवठा केला होता. मात्र आजवर बिलाचे पैसे मिळाले नाहीत. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला. चेअरमन गणेश पाटील यांनी एक सप्टेंबरपर्यंत थकीत बिले देण्याचे आश्वासन दिले होते. नंतर 15 सप्टेंबरपर्यंतची नवीन मुदत दिली. पण वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात पैसे मिळालेले नाहीत.

अनेक शेतकऱ्यांना दिलेले धनादेश निधीअभावी परत आले, अशी माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यामुळे मोठ्या आर्थिक फसवणुकीचा आरोप शेतकऱ्यांनी पाटील यांच्यावर केला.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे, माढा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर काळभोर आदींसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

