डीजे बंदीमुळे बँड-बँजो कलाकारांना आले सुगीचे दिवस

करमाळा (प्रवीण अवचर यांजकडून): यंदा प्रथमच सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून डीजे बंदीचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गणपती उत्सवामध्ये बँड, बँजो वादक कलाकार व पारंपारिक वाद्यांच्या गजरातच श्री गणरायाला निरोप देण्यात आला. या निर्णयामुळे बँड, बँजो वादक कलाकारांना सुगीचे दिवस आले आहेत.

वर्षानुवर्षे गणपती उत्सव मिरवणुकांमध्ये मोठ्या महागड्या, कर्कश्य डीजेंची मागणी असायची. त्यामुळे पारंपारिक बँड वादक, बँजो वादक कलाकारांना तुरळक ठिकाणीच काम मिळायचे. परिणामी ऐन उत्सव काळात त्यांच्या कमाईवर गंडांतर यायचे. तरुणाईत डीजेचे वाढते आकर्षण पाहता हा पारंपारिक व्यवसाय बंद पडतो की काय, अशी भीती गेल्या काही वर्षांत निर्माण झाली होती.

मात्र यावर्षी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली डीजे बंदीचे कडक धोरण राबवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मंडळांनी लाखो रुपये खर्च करून ॲडव्हान्समध्ये बुकिंग केलेले डीजे रद्द करून पारंपारिक वाद्य, बँड, बँजो यांना प्राधान्य दिले. त्यामुळे मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या आबालवृद्धांना उत्सवाचा पुरेपूर आनंद घेता आला. कारण गेल्या काही वर्षांत डीजेचा कर्कश्श खणखणाट व लेझर लाईटचा तीव्र प्रकाश यामुळे महिलांना व ज्येष्ठांना मिरवणुकीत सहभागी होता येत नव्हते.

सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच करमाळा तालुक्यातही डीजे बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली. यासाठी डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी विशेष लक्ष दिले. या निर्णयाला करमाळा तालुक्यातील गणपती मंडळांनी मोठा प्रतिसाद दिला. परिणामी यावर्षीची गणेश विसर्जन मिरवणूक अभूतपूर्व, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या निर्णयामुळे कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून बँड, बँजो वादकांनी प्रशासनाचे मनापासून आभार मानले.

कलाकारांची प्रतिक्रिया
डीजे बंदीबाबत कलाकारांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, डीजेंच्या अतिरेकामुळे बँड बँजोची मागणी दिवसेंदिवस कमी होत होती. त्यामुळे बँड बँजो चालकांनीही डीजेच्या तोडीस तोड महागडी सिस्टीम असलेली गाड्या बनवल्या होत्या. यामुळे पारंपारिक वादक कलाकारांवर उपासमारीची वेळ येऊ लागली होती. मात्र यावर्षी डीजेसोबतच या अतिशयोक्ती करणाऱ्या बँड-बँजो डीजे सिस्टीम मालकांनाही प्रशासनाने जरब बसवली. त्यामुळे त्यांना आम्हा पारंपारिक वादक कलाकारांना योग्य मानधन देऊन काम द्यावे लागले. आमची प्रशासनाकडे मागणी आहे की पुढेही उत्सव, मिरवणुका, लग्नसमारंभ यामध्ये डीजे सिस्टीम व बँड-बँजो डीजे सिस्टीमला बंदी असावी. त्यामुळे पारंपारिक कलाकारांवर उपासमारीची वेळ येणार नाही.

गेल्या काही वर्षांपासून मी अनेक वेळा डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या तक्रारी संबंधित विभागाकडे केल्या होत्या. परंतु देर आये दुरुस्त आये या म्हणीप्रमाणे यावर्षी जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. डीजेचा प्रखर आवाज आणि लेझर लाईटची झळ यामुळे ज्येष्ठ, लहान मुले आणि रुग्ण यांना होणाऱ्या भयानक त्रासातून यंदा मुक्तता झाली आहे.
— विवेक येवले, करमाळा