निवृत्ती सोहळ्यात मुलीने व्यक्त केलेल्या वडिलांविषयीच्या कृतज्ञ भावना

कुटुंब व्यवस्थेत आईला जितके महत्त्व आहे तितकेच वडिलांना देखील आहे. आई घराचे मांगल्य असते तर वडील घराचे खरे अस्तित्व असतात. रोजच्या छोट्या गोष्टींमध्ये आईची आठवण येते, पण आयुष्याची मोठी वादळे पेलताना वडिलांची साथ लागते. जेवणाची सोय आई करते, तर संपूर्ण आयुष्याची शिदोरी वडील तयार करतात. वडील आणि मुलगी यांचं नातं हे अतूट आणि जिव्हाळ्याचं असतं. अशाच एका वडिलांविषयीची कृतज्ञता त्यांच्या मुलीने वडिलांच्या सेवापूर्ती सोहळ्यात व्यक्त केली.

मूळचे करमाळा तालुक्यातील देवळाली येथील व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले अशोक शिवराम वीर हे ३० वर्षे कला शिक्षक म्हणून कार्यरत राहून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांच्या संगणक अभियंता असलेल्या मुलीने (सलोनी)आपल्या वडिलांबद्दल मनोगत खालील शब्दात व्यक्त केले. तिच्या भावना केवळ तिच्या वडिलांसाठी नसून प्रत्येक मुलीच्या हृदयातील भावनांना प्रतिनिधित्व करणाऱ्या ठरतात.

- बाबा आजचा दिवस स्पेशल आहे कारण हा तुमच्या आयुष्यातल्या एका मोठ्या प्रवासाचा शेवट नाही, तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे
- बाबा, तुम्ही आमच्यासाठी आयुष्यभर खूप कष्ट केलेत. घराच्या जबाबदाऱ्या, नोकरीतील ताण. तुम्ही नेहमी जबाबदारीनं सगळं सांभाळलं. आमच्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या स्वप्नांपर्यंत तुम्ही साथ दिलीत. आयुष्यभर स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून आमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली.
- तुमच्या शिस्तीमुळे, मेहनतीमुळे आणि माणुसकीमुळे आज आम्हाला अभिमानाने सांगता येतं की – हो, तुम्ही माझे बाबा आहेत
- लहानपणी मला वाटायचं – माझे बाबा सुपरमॅन आहेत. का? कारण बाबा शाळेतही जायचे, घरी आमच्यासोबत खेळायचेही, शाळेचा गृहपाठही करून द्यायचे, कधी स्वयंपाकघरात आईला मदतही करायचे, आणि तरीही त्यांच्याकडे आमच्यासाठी नेहमी वेळ असायचा
- बाबा नेहमी सांगतात की काम कितीही छोटं असलं तरी मनापासून करायचं. आणि खरं सांगायचं तर, आज मी आयुष्यात जे काहीही करते, ते बाबांनी शिकवलेलं शिस्त आणि प्रामाणिकपणा लक्षात ठेवून करते. त्यांच्या कृत्यांमधून आम्ही खूप शिकलो. जसं की वेळेचं महत्त्व, लोकांशी प्रामाणिक राहण्याचं महत्त्व, पैशापेक्षा नात्यांची किंमत, कसं नम्र राहायचं, जीवनातल्या समस्यांना कसं सकारात्मक दृष्टीने घ्यायचं, लोकांशी कसं वागायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं – कधीही हार मानायची नाही.
- बाबा तुम्ही आम्हाला फक्त जगायला शिकवलं नाही, तर माणूस म्हणून कसं राहायचं हेही शिकवलं. आयुष्यभर तुम्ही खूप कष्ट केलेत. तुमच्यासाठी “शाळा(नोकरीं)” म्हणजे कर्तव्य होते, आणि “कुटुंब” म्हणजे जबाबदारी. तुम्ही दोन्ही प्रामाणिकपणे निभावलं
- बाबा स्वतःसाठी कधी जगले नाहीत, सर्व इच्छा त्यांनी बाजूला ठेवल्या कारण त्यांना आधी आमचं भविष्य सुरक्षित करायचं होतं. त्यांनी कधीच स्वतःला काही नाही घेतलं पण आमच्यासाठी नेहमी सर्वोत्तम दिलं; त्यांनी स्वतःच्या स्वप्नांपेक्षा आमची स्वप्नं पूर्ण केली
- बाबा शरीरयष्टीने मजबूत आहेत, पण आतून ते खूप नाजूक आहेत. बाबांचा स्वभाव थोडा गंभीर प्रकारचा वाटतो. पण खरं सांगायचं तर ते आतून खूप संवेदनशील आहेत; त्यांना त्यांच्या आजूबाजूची लोकं आनंदात असताना पाहणे, हाच सर्वात मोठा आनंद आहे
- घरात खूप वेळा आर्थिक अडचण आली. पण बाबा आणि आईंनी कधी आम्हाला त्याची जाणीवच होऊ दिली नाही. बाबांनी स्वतःचे कित्येक छंद बाजूला ठेवले, पण आमच्या शिक्षणाला कधीही संकुचित होऊ दिलं नाही.
- बाबा शाळेतून घरी आले की घराचा वातावरण पूर्णपणे बदलायचा. आम्ही लहान होतो तेव्हा गृहपाठ नसेल केला तर आई ओरडायची, पण आम्ही confident असायचो कारण बाबा आल्यावर ते मदत करतील. पण नाही! बाबा ओरडायचेही—“होमवर्क नाही केला म्हणजे काय? मी ऑफिसला नाही गेलो असं चाललं असतं का?”
- बाबा नोकरीला किती प्रामाणिकपणे जात होते हे सांगायला शब्द कमी पडतील—त्यांना कधी गजर लावण्याची गरजच नव्हती—त्यांचं अंतर्गत अलार्म घड्याळ खूप शक्तिशाली होतं. रविवार असो किंवा सोमवार—ते त्याच वेळेस उठायचे. आम्ही मात्र अजूनही गजरचे बटण दाबण्यात आघाडी करतो. ऑफिसला बाबा कधीच उशिरा गेले नाहीत. खरं तर, मला वाटतं त्यांच्या वेळेच्या निष्ठेवरूनच ऑफिसमधली घड्याळं सेट केली जात असतील
- आमच्या घरात आईला खूप शॉपिंग आवडते, आणि बाबांना शॉपिंग म्हणजे शिक्षा वाटते. आईला सांगितलं की चल, शॉपिंग जाऊया, तर ती एकदम उत्साही होते – बॅग घेते, यादी करते, आणि दोन तास विंडो शॉपिंग करते. आणि बाबा? बाबांचा चेहरा अगदी असा असतो जणू कुणीतरी त्यांना जबरदस्तीने कोर्टात उभं केलंय
- घरात आमच्या तिघांनाही फिरायला खूप आवड, आणि बाबा एकदम विरुद्ध. कधी त्यांना म्हणतो चल, फिरायला जाऊया तर त्यांचं एकच उत्तर असतं – तुम्ही फिरून या, मी इथे घराची काळजी घेईन. कधी त्यांचा मूड असेल तर ते म्हणतात की जाऊ आपण फिरायला; मग आम्हाला वाटतं बाबा कोकणात घेऊन जाऊन, गोव्याला घेऊन जाऊन, पण शेवटी ते म्हणतात—आपण गावाला जावू. त्यांचं प्रवासाचं अर्थ साधा आहे: “आपण गावाला जाऊया.”
- आमची आई आम्हाला नेहमी विचारते, आज जेवायला काय करू? मग आम्ही सगळे आपापल्या कल्पनेप्रमाणे सुरुवात करतो – कुणी म्हणतो पनीरची भाजी कर, कुणी म्हणतो पावभाजी कर. पण बाबा कधीच काही खास सांगत नाहीत. ते फक्त म्हणतात, मला तर साधं चटणी-भाकरी असली तरी चालतं
- बाबांना जेवण खूप छान बनवता येतं. कधी कधी मला त्यांना विचारावं लागतं.. भाजीमध्ये मीठ किती टाकू, तिखट किती टाकू. कधी आई फिरायला गेली तर ते मला जेवण बनवायला मदत करतात; मग ते कितीही थकलेले असू देत, ते कधीच म्हणत नाहीत की तू मुलगी आहेस म्हणून तुला स्वयंपाक करावा लागेल. कधी कधी मग आईला कंटाळा आला तरी तेच करतात
- बाबा घरातही तितकेच व्यस्त असतात जितके शाळेत होते. कधी पंखा दुरुस्त करायचा, कधी वायफाय तपासायचा, कधी रिमोट शोधायचा; आमच्याकडे खराब झालेल्या वॉशिंग मशीन, फ्रिज नीट करण्यास बाहेरून तांत्रिक येण्याआधीच तो सर्व ठिकठिकाणे करून ठेवलेले असतात, त्यामुळे मला तर नेहमी वाटतं आमच्यासाठी बाबा हेच आयटी विभाग आहेत. आता ऑफिसचं अध्याय संपलंय, पण घराच्या अध्यायाची जबाबदारी अजूनही तुमच्याच वर आहे.
- आमचे बाबा म्हणजे मल्टीटास्किंग मशीनच आहेत—रिमोट नियंत्रण विशेषज्ञ, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, ड्रायव्हर, शिक्षक—सगळी कामं एका व्यक्तीत.
- असे आमचे सर्वांगिण बाबा..मजाक बाजूला ठेवता… बाबा तुम्ही फक्त माझे बाबा नाही आहात तर माझे आदर्श आहात

बाबांना कविता लिहिण्याची खूप आवड आहे, म्हणून मीही त्यांच्यासाठी चार ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला
तुम्ही माझ्या आयुष्यातले पहिले नायक आहात, आणि कायमचे आयुष्यभराचे आधार
तुमच्या घामाने घर उजळलं, तुमच्या कष्टांनी आमचं जीवन फुललं
तुम्ही आहात म्हणून मी आहे; तुम्ही दिलेल्या शिकवणीमुळेच आयुष्याला सामोरं जायची ताकद आहे. माझं प्रत्येक यश म्हणजे तुमच्या परिश्रमांना सलाम
लहानपणी मला हात धरून चालवलं, मोठं झाल्यावर मला उभं राहायला शिकवलं. आज तुमच्या डोळ्यात समाधान आहे, आणि माझ्या डोळ्यात अभिमान आहे.



