तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ४६ किलो गटात समृद्धी तळेकर विजेती

केम(संजय जाधव):क्रीडा युवक व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा कुस्ती स्पर्धेत राजाभाऊ तळेकर विद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी सचिन तळेकर (इयत्ता आठवी) हिने ४६ किलो वजनी गटात मॅटवरील प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळाली.

तालुकास्तरीय स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल पंचायत समिती, करमाळा यांच्या वतीने तिला पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यालयातर्फेही तिचा सत्कार करण्यात आला.

समृद्धीला पैलवान मदन (तात्या) तळेकर व तिचे वडील सचिन (बापू) तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या कामगिरीबद्दल केम परिसरातून कौतुक होत आहे.

संस्थेचे चेअरमन महेश तळेकर, सचिव व विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज तळेकर, शिवाजी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर, पदाधिकारी, क्रीडाशिक्षक बाळासाहेब सोनवणे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी समृद्धीचे अभिनंदन केले.


