उमरडच्या आठ खेळाडूंची पुणे विभागीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

करमाळा :महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत उमरड येथील श्री वामनराव बदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आठ खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

११ सप्टेंबर रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या राजीव गांधी इनडोर स्टेडियममध्ये ही स्पर्धा झाली. यामध्ये १४, १७ व १९ वर्षांखालील मुली व मुलांच्या गटांत या विद्यालयातील स्नेहा दत्तात्रय बदे, गीतांजली चंद्रकांत इंगळे, कल्याणी दिनेश सरडे, मेघा रमेश कोडलिंगे, ईशान इसाक शेख, सोहम शहाजी वलटे, साहिल नवनाथ पवार व ओम अनिल गुंजाळ या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

स्पर्धेदरम्यान त्यांनी सलग विजय मिळवत पंढरपूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, अक्कलकोट, माळशिरस आदी भागातील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. त्यांच्या खेळातील कौशल्य, जिद्द व संघभावनेची सर्वत्र प्रशंसा झाली.

या यशात क्रीडा शिक्षक संपत मारकड, पोपट माने व नागनाथ बोळगे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यालयाचे संस्थापक वामनराव बदे, अध्यक्ष गौतम बदे, सचिव बाळासाहेब पडवळे, माजी प्राचार्य संपतराव कोठावळे, मुख्याध्यापक सुनील सातव तसेच सर्व शिक्षकवर्ग व पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे उमरड गावासह संपूर्ण करमाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विद्यालयाचे नाव सोलापूर जिल्ह्यात गौरवाने झळकले आहे.


