करमाळ्याच्या प्रा. ज्योती मुथा यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

करमाळा : करमाळा शहराचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. मुथा नॉलेज फाउंडेशनच्या संस्थापिका प्रा. ज्योती मुथा यांना हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्डतर्फे बेस्ट अबॅकस टीचर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जयपूर येथे 17 ऑगस्ट रोजी देण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी देशातील केवळ शंभर शिक्षकांची या गौरवासाठी निवड करण्यात आली आहे.
नगर व सोलापूर जिल्ह्यातून प्रा. मुथा यांची निवड त्यांच्या अबॅकस क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या यशाच्या, सामाजिक कार्याच्या तसेच ‘दिव्य मराठी’तर्फे प्राप्त नारीशक्ती गौरव पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. या सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्डचे चीफ एडिटर व डायरेक्टर अभिषेक सोनी यांनी केले होते. लोकप्रिय कलाकार कपिल शर्मा हे यावेळी उपस्थित होते.
या यशामागे आई-वडील व पती दिनेश मुथा यांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे प्रा. ज्योती मुथा यांनी यावेळी आवर्जून सांगितले. शिक्षण क्षेत्रात तसेच समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या प्रा. मुथा यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाबद्दल करमाळ्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
