भोसेच्या सरपंच अमृता सुरवसे यांना ‘महाराष्ट्र ग्रामरत्न आदर्श सरपंच’ पुरस्काराचा मान -

भोसेच्या सरपंच अमृता सुरवसे यांना ‘महाराष्ट्र ग्रामरत्न आदर्श सरपंच’ पुरस्काराचा मान

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी : केवळ दोन-अडीच वर्षांच्या कारकिर्दीत अभिनव कल्पनांद्वारे गावोगाव विकास घडवून आणणाऱ्या भोसे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीच्या सरपंच अमृता प्रितम सुरवसे यांची “महाराष्ट्राचे ग्रामरत्न आदर्श सरपंच” या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषद आणि जयंत पाटील मित्र मंडळ, कुर्डू (ता. माढा) यांच्या वतीने 7 व 8 ऑक्टोबर 2025 रोजी लोणावळा येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

गावोगावच्या विकासाचे आदर्श उदाहरणात भोसे ग्रामपंचायतीने अंमलात आणलेली कामे उल्लेखनीय ठरली आहेत. आर.ओ. प्रकल्प बसवून भोसेसह हिवरवाडी, पिंपळवाडी, वडगाव, रावगाव आदी गावांतील ग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. पानंद रस्ते, मुरमीकरण, खडीकरण, अंतर्गत रस्त्यांचे डागडुजी, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, वृक्ष लागवड अशी मूलभूत कामे केली. बचत गटामार्फत रक्तदान शिबीर, सांडपाणी व गटारी व्यवस्था, गावातील पडीक जागांची स्वच्छता, प्राथमिक शाळेचे सुशोभीकरण, ग्रामदैवत मंदिरांचे सुशोभीकरण व रंगरंगोटी तसेच दलित वस्ती पाणीपुरवठा, रस्ते व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

या सर्व कामांना माजी सरपंच भोजराज सुरवसे यांचे मार्गदर्शन आणि सासरे माजी मुख्याध्यापक निवृत्ती सुरवसे यांची राजकीय–सामाजिक प्रेरणा लाभली. त्यामुळे सरपंच अमृता सुरवसे यांनी अत्यंत कमी कालावधीत गावाचा चेहरा बदलला. अशा उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार मिळाल्याने त्यांचा विशेष सन्मान ग्रामसुधार समितीने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!