उजनी धरणावरील वाढता दबाव : पाणीवापर संस्थांची गरज अधोरेखित – आमदार रणजितसिंह मोहिते पाटील -

उजनी धरणावरील वाढता दबाव : पाणीवापर संस्थांची गरज अधोरेखित – आमदार रणजितसिंह मोहिते पाटील

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : उजनी धरणावरील वाढत्या पाण्याच्या मागणीचा विचार करता करमाळा तालुक्यातील बिटरगाव (वां) येथे शेतकरी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली.

बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की, धरणातील उपलब्ध पाणी दीर्घकालीन टिकवायचे असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून पाण्याचे आरक्षण व नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अधिकाऱ्यांनी या संस्थांची कार्यपद्धती शेतकऱ्यांना समजावून सांगावी व शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त संस्था स्थापन कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

सध्या उजनी धरणासाठी एकूण ८४.३४ टीएमसी पाण्याचे नियोजन असून, त्यातील १० उपसा सिंचन योजनांचा वापर २१.७७ टीएमसी आहे. मात्र प्रत्यक्षात ७ ते ८ टीएमसीच पाणी वापरले जाते. उर्वरित १३ ते १४ टीएमसी पाणी वापर सुरू झाल्यास धरणावरील ताण आणखी वाढणार आहे. याशिवाय पुणे ते दौंड या पाणलोट क्षेत्रात महानगरपालिका, नगरपालिका, औद्योगिक वसाहती तसेच खाजगी उद्योगधंदे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करतात. पुणे-पिंपरी चिंचवडच्या शहरी विस्तारामुळे अतिरिक्त ७ टीएमसी पाणी राखून ठेवण्याची मागणी होत आहे. त्यातच डिसेंबर २०२५ पर्यंत मराठवाड्यासाठी ७ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने धरणावरचा दबाव लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे. धरणाचे क्षेत्रफळ ३५७ चौ.किमी असल्याने दरवर्षी सुमारे १७ टीएमसी पाणी बाष्पीभवनाने कमी होते. तसेच २०१९ मधील सर्वेक्षणानुसार सुमारे १५ टीएमसी गाळ साचल्याने साठवण क्षमतेत घट झाली आहे. ही वस्तुस्थिती आमदार मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली. त्यांनी धरणाचे पाणी टिकवण्यासाठी सर्व गावांनी एकत्र येऊन पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्याची गरज अधोरेखित केली.

या बैठकीस खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, शिवतेजसिंह मोहिते पाटील, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, सविताराजे भोसले, शहाजीराव देशमुख, अजित तळेकर, महेंद्र पाटील, पै. अतुल पाटील, डॉ. हरिदास केवारे, धुळभाऊ कोकरे, संतोष खाटमोडे, ॲड. राहुल सावंत, राजाभाऊ कदम यांच्यासह विविध गावचे सरपंच, शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सौ. डुंबरे, उपअभियंता जडे यांच्यासह अधिकारीही या वेळी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!