आवडत्या शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले

केम(संजय जाधव): केम येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील उपशिक्षक प्रल्हाद रामकिशन गर्कळ यांच्या बदलीनंतर शाळेत भावनिक वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी निरोप समारंभात धायमुक्त होऊन रडत आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप दिला.

गर्कळ यांनी केम येथे दोन वर्ष सेवा केली. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना एटीएस परीक्षेत यश मिळवून दिले, गुणवत्ता यादीत स्थान मिळवून दिले. मुलांशी त्यांनी घट्ट नाते जोडले. त्यामुळेच निरोपाच्या क्षणी विद्यार्थी जणू आईपासून वेगळे होत असल्यासारखे व्याकुळ झाले.

गर्कळ यांची यापूर्वीची सेवा उपळे नं. १, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथे झाली होती. एकूण १९ वर्षांच्या सेवेनंतर त्यांची जिल्हा बदली होऊन केम येथे नियुक्ती झाली. केममधील दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर आता त्यांची बदली पोथरे (ता. करमाळा) येथे झाली आहे.
शाळा व्यवस्थापन समिती, पालक व गावकऱ्यांच्या वतीने त्यांना भावनिक निरोप देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या भावना!
“गर्कळ सर खूप मातृत्वसुलभ व्यक्तिमत्त्व आहे. माझी मुलगी त्यांची विद्यार्थिनी असून सरांची बदली झाल्याने अजूनही ती सावरलेली नाही,” असे उपशिक्षक मंगेश सोलापूरे यांनी सांगितले.


