पाठ्यपुस्तकातील कवयित्रीचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद – उलगडले कवितांचे रहस्य

केम(संजय जाधव) – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज, केम येथे “लेखक आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत इयत्ता बारावी मराठी पाठ्यपुस्तकातील नामवंत कवयित्री कल्पना दुधाळ यांचा आगळावेगळा शैक्षणिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमामधून पाठ्यपुस्तकातील लेखक आणि विद्यार्थी यांच्यात थेट संवाद साधला जातो. या कार्यक्रमात लेखक आपल्या लेखनाची पार्श्वभूमी, जीवनप्रवास आणि लेखन प्रक्रियेबद्दल चर्चा करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील आशयाचा सखोल अनुभव मिळतो आणि लेखकाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य माधव बेले उपस्थित होते. कवयित्री कल्पना दुधाळ यांनी पुण्यातून गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. दुधाळ यांची “रोज मातीत” ही कविता इयत्ता बारावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे.

विद्यार्थ्यांनी कवयित्रींशी त्यांच्या बालपण, शिक्षण, लेखनाची प्रेरणा, कवितांमधील शेतकरी जीवन, पावसामुळे होणारे नुकसान अशा विविध विषयांवर मुक्तपणे चर्चा केली. कवयित्रींनी आपल्या कवितांना निसर्ग आणि समाजातील घडामोडीच प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना “वाचन हे जीवन समृद्ध करणारे साधन” असल्याचा मौलिक सल्ला दिला.

कार्यक्रमादरम्यान कवयित्रींनी ग्रामीण भागातील नवोपक्रमांचे तसेच दरवर्षी होणाऱ्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे मराठी साहित्य संमेलनाचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांना आपल्या पाठ्यपुस्तकातील कवयित्रीशी थेट संवाद साधण्याची संधी लाभल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते. या उपक्रमासाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. डॉ. संतोष साळुंखे, प्रा. एस.के. पाटील, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. सतीश बनसोडे, तुकाराम पवार, गणेश जाधव, ओंकार घाडगे यांनी सहकार्य केले.


