माजी आमदार संजयमामा शिंदे यांची पूरग्रस्त भागाची पाहणी, पुरग्रस्तांना ब्लँकेट वाटप

करमाळा : अहमदनगर जिल्ह्यातील पूरस्थिती आणि करमाळा तालुक्यातील मुसळधार पावसामुळे सीना नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे. गेल्या आठ दिवसांत तीन वेळा संगोबा पुलावर पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजय शिंदे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांसह पुरपरिस्थितीची पाहणी केली.

मांगी तलावाच्या सांडव्यातून शेतात शिरलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच खडकी व तरटगाव परिसरातील सीना नदीपात्रातील बंधाऱ्यांची तुटफूट, उलटून गेलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले पीक नुकसान आणि संगोबा, बोरगाव, आळजापूर, फिसरे, आवाटी आदी गावांमधील शेतीचे नुकसान याचा आढावा घेतला. पोटेगाव येथील बंधारा तातडीने दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी आनंदी मंगल कार्यालय (पोथरे), महामुनी मंगल कार्यालय (करमाळा), आवाटी येथील दर्गा तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये आश्रयाला गेलेल्या विस्थापित शेतकऱ्यांनाही त्यांनी भेट दिली. विस्थापितांसाठी पांघरूणांची तातडीची आवश्यकता असल्याचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर, आवश्यक तेवढे ब्लँकेट देण्याची घोषणा माजी आमदार शिंदे यांनी केली.

त्यानुसार, शुक्रवारी रात्री महामुनी मंगल कार्यालय येथे विस्थापितांना ८५ ब्लँकेटचे वाटप संजय शिंदे गटाचे शिवराज जगताप, अजिंक्य पाटील व सुजित बागल यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी आनंदी मंगल कार्यालय व आवाटी दर्गा येथील विस्थापितांसाठी आवश्यक असलेली ब्लँकेट तहसील कार्यालयाकडे जमा करण्यात आली असून त्यांचे वितरण प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे.



