संघर्षातून कुंकू कारखाना चालवणारी नवदुर्गा!

केम(संजय जाधव) : नवरात्रीच्या पावन पर्वावर जेथे देवीच्या रूपांचा गौरव केला जातो, त्याच वेळी केम (ता. करमाळा) येथील वंदना प्रदीप येवले या खऱ्या अर्थाने “नवदुर्गा” म्हणून समोर येतात. पतीचे छत्र हरपल्यानंतर अडचणींचा डोंगर समोर उभा राहिला, तरी हार न मानता कुटुंबाचा कुंकू कारखान्याचा व्यवसाय त्यांनी नव्या जोमाने उभारला. समाजाचा पाठिंबा, स्वतःची जिद्द आणि अढळ आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी पतींचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार केला.

वंदना यांचे माहेर जामखेड (जि. अहिल्यानगर) येथे असून तेथेच त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. 1995 साली त्यांचा विवाह प्रदीप मधुकर येवले यांच्याशी झाला. येवले कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे कुंकू, गुलाल आणि भंडारा उत्पादन. लग्नानंतर वंदना यांनी घरकामासोबत कारखान्यातही हातभार लावण्यास सुरुवात केली. पतींनी व्यवसायातील प्रत्येक टप्पा – रंगणी, दळणे, वाळवणीपासून तयार मालाच्या प्रतवारीपर्यंतचे कौशल्य त्यांना शिकवले.

व्यवसाय चांगला सुरू असतानाच कुटुंबावर मोठे संकट आले. पतींना गंभीर आजार झाला आणि मोठा खर्च उपचारांवर गेला. अशा परिस्थितीतही वंदना यांनी हार न मानता कामगारांच्या साहाय्याने उत्पादन सुरू ठेवले. मात्र 2022 मध्ये पतींचे दुःखद निधन झाले आणि त्यांच्या आयुष्यात अंधार दाटून आला.


“घरात कर्ता उरला नव्हता, पण व्यवसाय चालू ठेवणे भाग होते,” असे वंदना आठवणीने सांगतात. एक महिना शोककाळानंतर त्यांनी भावकी, नातेवाईकांचा सल्ला घेऊन पुन्हा नव्या जोमाने व्यवसाय हाती घेतला. या प्रवासात गावातील व्यापारी, कच्चामाल पुरवठादार, कामगार आणि समाजाने त्यांना मोठे सहकार्य दिले.

आज त्या व्यवसायाला स्थिरता मिळवून देत आहेत. मोठी मुलगी अमृता हिने एम.एस्सी. (फिजिक्स) पर्यंत शिक्षण घेतले असून तिचे लग्न झाले आहे, तर धाकटी श्रेया सध्या शिक्षण घेत आहे.
वंदना येवले या खऱ्या अर्थाने संघर्षातून उभ्या राहिलेल्या स्त्रीशक्तीचे उदाहरण आहेत. पतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी दाखवलेली जिद्द समाजातील इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरते.

