संकटकाळातील खरा तारणहार — ॲड. शशिकांत नरूटे -

संकटकाळातील खरा तारणहार — ॲड. शशिकांत नरूटे

0

२२ सप्टेंबर २०२५  घटस्थापनेचा दिवस. अहिल्यानगर, कडा, आष्टी परिसरात अतिवृष्टीचा कहर ओसंडून वाहत होता. दोन बंधारे फुटल्याची बातमी आली आणि क्षणात माझ्या मनात एकच विचार चमकून गेला — सीना नदी… संगोबा मंदिर… आणि त्या परिसरातील बोरगाव, खांबेवाडी, निलज, तरडगावसह असंख्य निष्पाप जीव. आणि लगेच डोळ्यांसमोर उभं राहिलं एक व्यक्तिमत्व — ॲड. शशिकांत नरूटे

शहरातल्या उच्च पदांवर असणाऱ्या अनेकांनी मोबाईलमधून फक्त फोटो पाहिले असतील, पण नरूटे सर मात्र प्रत्यक्ष पूरस्थितीच्या मध्यभागी उभे होते — रात्रभर व्हाट्सअप स्टेटसमधून प्रत्येकाला हाक मारत!

“बाबांनो, वेळ गेलेली नाही… रात्र वैऱ्याची आहे… बाहेर पडा!”
इतकी तळमळ, इतकी धडपड — ती शब्दात मावत नाही.
संगोबा मंदिरात अडकलेले १०० जीव  आणि नरूटे सरांचे धीराचे शब्द

जेव्हा मी सरांना फोन केला, ते म्हणाले “आम्ही ९० ते १०० जण सध्या संगोबा मंदिरात आहोत. तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे यांनी सोय केली आहे. आमच्यात १२ तलाठी, २ सर्कल अधिकारी, पोलीस पाटील, काही कुटुंबे — सर्वजण अडकले आहेत. मंदिराला चहूबाजूंनी पाणी.”हे ऐकताच माझे हृदय थरारले. लहान मुले… जेवण नाही… बाहेर महापूर…त्या वेळी आदिनाथ महाराज ट्रस्टचे योगेश शिंदे पोथरे यांनी अन्नदान करून मदतीचा हात दिला, ही मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी बाब आहे.

NDRF ची बोट अडकली — गावकऱ्यांची धाडसी मदत

दुसऱ्या दिवशी कळले की NDRF जवान मदतीला पोहोचले, पण पाण्याचा अंदाज न आल्याने बोट लोखंडी बांधकामाला धडकून अडकली. जवानसुद्धा संकटात! पण या वेळी स्थानिक तरुणांनी विशेषतः ॲड. राहुल सावंत, संतोष वारे, सरपंच अंकूश शिंदे,शांतीलाल  झिंजाडे व इतरांनी स्वत: जीव धोक्यात घालून जवानांना व लोकांना बाहेर काढले. अशा घटना सांगताना अभिमानाने छाती फुगते हा आपला महाराष्ट्र आहे!

उपमुख्यमंत्र्यांकडे पुलाची मागणी — अभ्यासपूर्ण मांडणी
पूरानंतर  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दौऱ्यावर आले असता सीना नदीवरील पूल किती महत्त्वाचा आहे, हे नरूटे सरांनी अभ्यासपूर्ण रितीने सादर केले.त्या पुलामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुवा जोडला जाईल, हे त्यांनी इतक्या भावनेने मांडले की दादा सुद्धा भारावून गेले.

आजही ७०० पेक्षा अधिक जणांचे धीराचे आधारस्तंभ
दिनांक २८ सप्टेंबर रोजी जेव्हा पुन्हा मी त्यांना फोन केला, ते म्हणाले
“आम्ही सध्या महामुनी मंगल कार्यालयात ७०० ते ७५० लोकांसह सुरक्षित आहोत, पण पूर अजून ओसरायला तयार नाही… परिस्थिती हाताबाहेर आहे.” पण या सगळ्यात तेच म्हणत राहिले
“सावध रहा… जिवाचे रक्षण करा… दिवस आहे तोवर बाहेर पडा… रात्र वैऱ्याची आहे!”
ॲड. शशिकांत नरूटे सर हे खरे सैनिक आहेत. त्यांच्या कार्याला सलाम.

✍️ चंद्रहार भगवानराव खटके, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!