पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मिळणेबाबत दहिगाव येथे उद्यापासून आमरण उपोषण

करमाळा, ता.४:दहिगाव (ता. करमाळा) येथील हनुमंत शंकर तकीक यांच्या शेतीचे पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळणेबाबत आणि शेतीतील अतिक्रमण काढण्याबाबत उद्यापासून (दिनांक ५ ऑक्टोबर) दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर तकीक परिवार आमरण उपोषण करणार आहेत.

याबाबत श्री. तकीक यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की.. आमच्या कुटुंबियांच्या नावावर सर्व्हे नं. 195/9 मधील शेतजमीन आहे. दिनांक 12 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे आमच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. 2020 पासून दर वर्षी पावसाच्या पाण्याचा साठा शेतात होत असून, शेतातील पिके वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. स्थानिक रस्त्याच्या अतिक्रमणामुळे तसेच नाल्यावरील अडथळ्यांमुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा थांबून शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे आमचे पिकाचे नुकसान होऊन लाखो रुपयांची आर्थिक हानी झाली आहे.

याबाबत ग्रामपंचायत, महसूल विभाग, तालाठी, कृषी विभाग व पोलीस पाटील यांना वारंवार कळवूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. 4 ऑक्टोबर 2025 पूर्वी संबंधित अतिक्रमण आणि निचऱ्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी करूनही कोणीही कारवाई केलेली नाही.
त्यामुळे आम्ही उद्यापासून (ता.५ ) ग्रामपंचायत कार्यालय दहिगाव येथे अमरण उपोषणास बसणार आहोत,असे सांगितले.








