शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला- बागलगटाकडून हल्ला केल्याचा आरोप-हल्ल्याशी आमचा संबंध नाही – बागल

करमाळा(संदेश प्रतिनिधी) : शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर काल शनिवारी (ता.४) सकाळी हिवरवाडी रस्त्यावर मांगी येथील लांडगे नामक तरुणांने हल्ला केला आहे. हा हल्ला दिग्विजय बागल व रश्मी बागल यांच्या सांगण्यावरून झाला असा आरोप श्री. चिवटे यांनी केला आहे. तर हा हल्ला आम्ही केलेला नाही. ही बाब आम्हाला माहीत नाही व असे आम्ही करत नाही, असे दिग्विजय बागल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित मनोज उर्फ आकाश संजय लांडगे राहणार मांगी हल्ली हिवरवाडी तालुका करमाळा या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

“माझ्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित आहे. लांडगे याने हल्ला केला आणि त्यामागे दिग्विजय बागल व रश्मी बागल यांची चीथावणी आहे.” मी मकाई च्या कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढत आहे. त्यामुळे बागल चिडले आहेत. पण मी घाबरणारा नाही. बागलांनी पुर्वी अप्पासाहेब झांर्जुणे, जयप्रकाश बीले, सूर्यकांत पाटील यांना अशीच मारहाण केली, असेही श्री. चिवटे यांनी म्हटले आहे.

यावर तत्काळ पत्रकार परिषद घेऊन दिग्विजय बागल यांनी सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले,“आम्ही असा कोणताही प्रकार केला नाही. माझे कार्यकर्ते तालुक्यात असंख्य आहेत, पण कोणाच्याही कृतीला आम्हाला जबाबदार धरणं चुकीचं आहे. कारण नसताना माझं आणि रश्मीदिदीचे नाव घेतलं जात आहे. हे चुकीचे आहे.मी त्यांना कधीही धमकी दिलेली नाही व या हल्ल्याशी काहीही संबंध नाही.”
असे स्पष्ट केले.

माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर महेश चिवटे त्यांच्यासोबत काम करत आहेत.दिग्विजय बागल यांनीही विधानसभा निवडणूक शिवसेनेतून लढवली होती. मात्र जगताप गट आणि बागल गट यांच्यातील वैर जुने असून अलीकडे दोन्ही बाजूंनी तणाव वाढलेला दिसतो.

या हल्ल्यानंतर करमाळा तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून सोशल मीडिया आणि गावपातळीवर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. एकंदरीत शिंदे गटातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. वरीष्ठ काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


