पुराचा धोका टाळण्यासाठी कान्होळा नदीवरील अतिक्रमण हटवावे – प्रशासनाला निवेदन

करमाळा: निलज ग्रामपंचायत हद्दीतील कान्होळा नदीवर अनेक ठिकाणी अनियंत्रित अतिक्रमण करून पक्की घरे बांधण्यात आली आहेत आणि जमिनी तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे गेल्या पूरात गावाला मोठे नुकसान झाले होते. या अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करावी आणि गायरान जमिनीची योग्य पुनर्स्थापना करण्यासाठी शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी न्यू रासपचे नेते अशोकराव वाघमोडे यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, निलज ग्रामपंचायत कान्होळा व सिना या दोन नद्यांच्या विळख्यात वसलेली असून निसर्गरम्य सौंदर्याने नटलेले हे गाव दरवर्षी पूराच्या संकटांना सामोरे जाते. गेल्या काही वर्षांत कान्होळा नदीच्या काठावर अनियंत्रित अतिक्रमणे झाली आहेत. काही लोकांनी नदीच्या जमिनीवर अतिक्रमण करून पक्की घरे बांधली आहेत, तर काही ठिकाणी जमिनी तयार करून वहीवाट केल्या आहेत आणि विविध बांधकामे केली आहेत. यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडथळा निर्माण झाला आहे.

गेल्या महिन्यात आलेल्या महापूरात या अतिक्रमणांमुळे गावाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. नदीचा प्रवाह अवरोधित झाल्याने पाणी घरांत शिरले आणि जनजीवन ठप्प झाले. अशोकराव वाघमोडे यांनी सांगितले, “नद्यांवरील ही अतिक्रमणे अनेक वर्षांपासून सुरू आहेत, पण प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. गायरान जमिनी व नदीजमिनी अतिक्रमणांच्या बळी ठरल्या आहेत, ज्यामुळे पूराचे प्रमाण आणि नुकसानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.”

अतिक्रमणांमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलला जातो आणि पूर येण्याची शक्यता वाढते. म्हणून सर्व अतिक्रमणे तातडीने हटवणे गरजेचे आहे आणि गायरान जमिनीची पुनर्स्थापना करणे आवश्यक आहे. शासनाने याबाबत त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी श्री. वाघमोडे यांनी केली.



