विक्रांत जाधवची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड – डी. जी. पाटील विद्यालयाचा विद्यार्थी

करमाळा : युवक व क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी पंढरपूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत करमाळा येथील डी. जी. पाटील विद्यालयाच्या १७ वर्षाखालील गटातील पै. विक्रांत गणेश जाधव याने ६५ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विक्रांत जाधवने सहा फेऱ्यांमध्ये दमदार खेळी करत सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली व विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यासह विविध तालुक्यांतील शालेय पैलवानांनी सहभाग घेतला होता.

या यशाबद्दल संस्थेच्या सचिव अर्चना पाटील, अध्यक्ष दिनेश पाटील, मुख्याध्यापक माधव गायकवाड, शाळा व्यवस्थापक किरण शेंदरकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विक्रांतचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. करमाळा शहरातूनही विक्रांतच्या या कामगिरीचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.





 
                       
                      