प्रा. गणेश करे-पाटील यांचा टपाल तिकीटाद्वारे गौरव

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : समाजकार्यात आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारे युवा समाजसेवक प्रा. गणेश करे-पाटील यांना भारतीय डाक विभागाकडून एक अनोखा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव म्हणून भारतीय डाक विभागाने त्यांचे विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले आहे.

हा विशेष सोहळा वसंत महोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात पार पडला. मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व प्रसिद्ध संशोधक डॉ. अरविंद देशमुख आणि डाॅ. प्रचिती पुंडे यांच्या हस्ते या तिकीटाचे अनावरण करण्यात आले. या वेळी अक्कलकोट स्वामी देवस्थानचे विश्वस्त भारतराव शिंदे-पाटील, डॉ. इंदिरा पाटील, डॉ. महेंद्र पाटील, प्रा. बाळकृष्ण लावंड, राजकुमार दोशी, दिलीप तळेकर तसेच शेकडो शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

प्रा. गणेश करे-पाटील हे यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, त्यांनी मागील अकरा वर्षांहून अधिक काळ समाजोपयोगी कार्याचा वसा जपला आहे. राष्ट्रपतींचे विज्ञान सल्लागार स्व. वसंतराव दिवेकर यांच्या प्रेरणेने त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाची चळवळ गतीमान करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

शिक्षक सक्षमीकरण शिबिरे, अभ्यास सहली, आदर्श शिक्षकांचा गौरव, विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक पाठबळ, विज्ञानविषयक कार्यशाळा, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सततचे समुपदेशन — अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणले आहे.
यापूर्वीही अण्णा हजारे, आयपीएस विश्वास नांगरे-पाटील, डॉ. तात्याराव लहाने, ग्लोबल टीचर रणजीत डिसले, विक्रम अडसुळ आणि विधीज्ञ अविनाश गोखले यांसारख्या समाजसेवकांचा सन्मान भारतीय डाक विभागाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन अशाच टपाल तिकिटाद्वारे केला आहे.
“युवा समाजसेवक प्रा. गणेश करे-पाटील यांचे कार्य दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. समाजासाठी सर्वोच्च योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची नोंद घेऊन भारतीय डाक विभाग त्यांना आदरांजली वाहतो.”
— अमित देशमुख, उपविभागीय डाक निरीक्षक, कराड उपविभाग, जि. सातारा.



