एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या गणेश सरडे यांचा चिखलठाण ग्रामस्थांकडून सत्कार

करमाळा(दि.२१): एमपीएससी परीक्षेत यश मिळवत चिखलठाण येथील गणेश मच्छिंद्र सरडे यांची कृषी आयुक्तालय, पुणे येथे महसूल सहाय्यक पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा सत्कार चिखलठाण क्र.1 येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिनांक २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड यांनी या सत्काराचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गणेश सरडे यांचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गणेश सरडे यांनी सत्काराला उत्तर देताना, “गावकऱ्यांकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून प्रेरणादायी आहे,” असे सांगत ग्रामस्थांचे आभार मानले.

कार्यक्रमाला विकास गलांडे (चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चिखलठाण), दिनकर सरडे (संचालक, मकाई सहकारी साखर कारखाना), गव्हाणे भाऊसाहेब (व्हाइस चेअरमन, आदिनाथ सहकारी साखर कारखाना), मच्छिंद्र सरडे (संचालक, सोसायटी), डॉ. भूषण बारकुंड, आकाश गलांडे (लेखा कोषागार विभाग) यांसह गावातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




