निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर यांना महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच पुरस्कार प्रदान

केम(संजय जाधव): लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच सन्मान व गौरव पुरस्कार सोहळ्यात निंभोरे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील लोकनियुक्त सरपंच रविंद्र अंकुश वळेकर यांना ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सरपंच वळेकर यांनी शिक्षण, आरोग्य, खेळ, पायाभूत सुविधा व ग्रामविकास या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. शाळा व विद्यालयाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. सलग ११ वर्षांपासून ते विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धा परीक्षा आयोजित करीत असून, बक्षीस स्वरूपात शालेय साहित्य, शाल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. दहावीतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करून एक आगळी वेगळी संकल्पना त्यांनी राबविली आहे.

गावाच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक प्रगतीसाठी त्यांनी आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीर, महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबिरं, तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे.

ग्रामविकासाच्या दृष्टीने सरपंच वळेकर यांनी निंभोरे-कोंढेज रस्ता तयार करण्यासाठी माजी आमदार संजय मामा शिंदे आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून तो मार्ग तयार करून घेतला. याशिवाय गावासाठी आरोग्य उपकेंद्र, तलाठी कार्यालय मंजूर करून घेतले, तर पानंद रस्ता, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घंटागाडी व कचराकुंड्या, स्मशानभूमीचे वॉल कंपाउंड, गावठाणातील पेविंग ब्लॉक रस्ते, आंबेडकर नगर पाण्याची टाकी व नळ योजना, मुख्य चौकातील सीसीटीव्ही व हायमास्ट दिवे आदी उपक्रम राबवले आहेत.

ग्रामपंचायतीत सर्व महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्याची परंपरा त्यांनी सुरू ठेवली आहे. या सर्व कार्यांचा विचार करून सरपंच रविंद्र वळेकर यांची “महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच” या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. वळेकर यांच्या निवडीनंतर त्यांचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.


