महिला आयोग स्वायत्ततेसाठी मागणी – निवृत्त महिला न्यायाधीशांची नियुक्ती व्हावी

करमाळा: महाराष्ट्रातील डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू आणि हगवणे कुटुंबातील आत्महत्येच्या घटनांनी महिला आयोगांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दोन्हीही प्रकरणांमध्ये पीडित महिलांनी राज्य महिला आयोगाकडे लिखित तक्रारी दिल्या होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी केंद्र सरकारकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात राष्ट्रीय तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त महिला न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. झिंजाडे म्हणाले की, “महिला आयोग हे राजकीय दबावाखाली कार्य करणारे नसून, महिलांना न्याय देणारे स्वायत्त संस्थान असले पाहिजे. म्हणूनच निवृत्त महिला न्यायाधीशच आयोगाचे नेतृत्व करावे.”
या मागणीची प्रत महिला व बाल विकास मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती कार्यालय आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे पाठवण्यात आली आहे.






