घोटीचे पुणे येथील व्यवसायीक नानासाहेब ननवरे यांचे निधन

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.३१: घोटी येथील रहिवासी व पुणे येथील प्रसिद्ध व्यावसायिक नानासाहेब पांडुरंग ननवरे (वय ७०) यांचे दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नानासाहेब ननवरे यांनी सन १९७२ साली घोटी गावातून पुणे शहरात स्थलांतर करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. प्रारंभी अल्प साधनात ‘बिल्डिंग मटेरियल सप्लाय’ व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांची सचोटी, प्रामाणिकपणा, ग्राहकांशी सुसंवाद आणि परिश्रमशील वृत्तीमुळे हा व्यवसाय हळूहळू विस्तारला. त्यांनी नम्रता आणि विश्वास या दोन गुणांच्या बळावर व्यावसायिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले सचिन ननवरे व अविनाश ननवरे यांनी देखील वडिलांच्या परंपरेला पुढे नेत कन्स्ट्रक्शन व प्लॉटिंग व्यवसायात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
त्यांच्यावर २९ ऑक्टोबर रोजी पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
