चिखलठाण परिसरातील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारीतून तांब्याच्या तारा व केबल चोरीला – शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

करमाळा : चिखलठाण नं. १ परिसरातील उजनी बॅकवॉटर लगतच्या शिवारात अज्ञात चोरट्यांनी ११ शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारींमधील तांब्याच्या तारा तसेच केबल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेतकरी संतोष चांगदेव सरडे यांनी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादींच्या माहितीनुसार, त्यांची गट क्र. ५०५/१ मध्ये शेती असून, सिंचनासाठी त्यांनी दिनकर बारकुंड यांच्या क्षेत्रातील उजनी बॅकवॉटरवर इलेक्ट्रिक मोटार बसवली आहे. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रात्री मोटार व्यवस्थित सुरू होती. मात्र, दुसऱ्या दिवशी (२७ ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास मोटार सुरू करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी पाहिले असता मोटारीतील तांब्याची तार काढून ती बाजूला टाकलेली होती.

चौकशीअंती इतर 10 शेतकऱ्यांच्या मोटारीतील तांब्याचे तारे व केबल वायर देखील चोरीस गेल्याचे आढळून आले. या चोरीत खालील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे –
- संतोष सरडे : ७.५ एच.पी. मोटारीतील तांब्याची तार (किंमत ₹४,०००)
- शिवाजी ज्ञानदेव सरडे : १० एच.पी. मोटारीतील तांब्याची तार (₹५,०००)
- विठ्ठल वसुदेव सरडे : १० एच.पी. मोटारीतील तांब्याची तार (₹५,०००)
- शामराव दामोदर सरडे : १२.५ एच.पी. मोटारीतील तांब्याची तार (₹६,०००)
- भिमराव रामचंद्र गोळे : १० एच.पी. मोटारीतील तांब्याची तार (₹५,०००)
- सौरभ सोमनाथ गोळे : १० एच.पी. मोटारीतील तांब्याची तार (₹५,०००)
- बंडु पाटील : २० एच.पी. मोटारीतील तांब्याची तार (₹५,०००)
- बन्सी संभाजी बारकुंड : २०० फुट केबल (₹५,०००)
- आप्पासाहेब शंकर सरडे : २०० फुट केबल (₹५,०००)
- मारुती भगवान सरडे : ३०० फुट केबल (₹५,०००)
- धनाजी बन्सी बारकुंड : ७५ फुट केबल (₹३,०००)
एकूण अंदाजे ₹५३,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

ही घटना २६ ऑक्टोबर रात्री १० वाजता ते २७ ऑक्टोबर दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.
मागच्या महिन्यात खातगाव येथील २९ शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारींच्या तारांची चोरी झाली होती अद्याप त्याचा तपास लागला नसून आता चिखलठाण येथे नवीन चोरी उघडकीस आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.



