एव्हरेस्टवीर शिवाजी ननवरे यांचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2025’ मध्ये नोंद – कोंढेज गावाचा आंतरराष्ट्रीय सन्मान..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील कोंढेज गावचे सुपुत्र आणि नागपूर शहर पोलिस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी ननवरे यांनी पर्वतारोहण क्षेत्रात आणखी एक मानाचा मुकुट मिळवला आहे. त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (8,848.86 मीटर) सहित ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची चार शिखरे — मकालू (8,485 मी.), मनासलू (8,163 मी.) आणि ल्होत्से (8,516 मी.) — यशस्वीरीत्या सर केली आहेत.

या दुर्मीळ आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2025’ मध्ये झाली आहे. या यशाबद्दल त्यांचा नागपूर येथे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्यात सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सिंग परदेशी, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अभिजीत पाटील, तसेच पोलीस निरीक्षक राहुल शिरे आदी मान्यवर उपस्थित होते. एपीआय ननवरे यांचा या प्रसंगी विशेष सत्कार करून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या असामान्य यशामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोंढेज गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.




