अखेर केम ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेऊन केम–रोपळे रस्ता केला दुरुस्त

केम(संजय जाधव): केम–रोपळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. मात्र विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली होती. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे पुलापासून ते पेट्रोल पंपापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

या परिस्थितीची दखल घेत केम ग्रामपंचायतीच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ठेकेदार नाना सांगडे यांनी स्वखर्चाने रोलरची व्यवस्था करून दिली, तर मदन गायकवाड आणि सुग्रीव शिंदे यांनी आपल्या वाहनातून मुरूम आणून टाकला.

या कामात सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे, माजी सरपंच अजित तळेकर, उपतालुका प्रमुख हरिभैया तळेकर, सागर देवकर, नाना देवकर आणि ओंकार जाधव, युवराज तळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


ज्या प्रमाणे केम–रोपळे रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने मोठमोठे खड्डे बुजवून मुरूम टाकण्यात आला, त्याचप्रमाणे केम–भोगेवाडी रेल्वे पुलाखालील रस्त्यावरही मुरूम टाकण्यात यावा. त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
–संजय जाधव, पत्रकार (केम)



