केम-भोगेवाडी रस्त्याची देखील केम ग्रामपंचायतीकडून दुरुस्ती- नागरिकांमध्ये समाधान

केम (संजय जाधव): केम–भोगेवाडी रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली पडलेले मोठे खड्डे केम ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बुजवण्यात आले असून, रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे केम परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यावरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती, तर किरकोळ अपघातांचाही धोका वाढला होता.

ग्रामपंचायतीने पुढाकार घेत केम–रोपळे रस्ता रेल्वे पुलापासून पेट्रोल पंपापर्यंत मुरुम टाकून दुरुस्त केला होता. मात्र, भोगेवाडी रस्ता देखील दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे ‘संदेश’ च्या बातमीत प्रसिद्ध होताच ग्रामपंचायतीने तत्काळ दखल घेत भोगेवाडी रस्त्याचीही दुरुस्ती केली.
संबंधित बातमी: अखेर केम ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेऊन केम–रोपळे रस्ता केला दुरुस्त


या कामाच्या वेळी माजी सरपंच व युवा नेते अजित तळेकर, सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे, प्रहार संघटनेचे बापुराव तळेकर, किशोर शिंदे, तात्या गुरव, समाधान बोगांळे आदी उपस्थित होते.

