काय तुमच्या मताची किंमत ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यावर होतात आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असतात असं म्हटलं जातं.परंतु निवडणूकी नंतर कार्यकर्त्यांच्या आडून हे नेते मंडळीच कारभार करुन आपलं बस्तान बसवताना दिसतात, सध्या करमाळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव आहे. तसेच नगरसेवक पदीही महिलांना संधी आहे,पण इथेही पुरुष नेतेमंडळी आपल्या सामान्य कार्यकर्त्यांमधील व्यक्तीच्या घरातील महिलेला संधी न देता स्वतःच्या घरातील महिलेला पुढे करुन निवडणूकीची रणनिती स्वतः ठरवतात आणि निवडणूक आल्यावर त्या महिलेच्या नावावर कारभार चालवतात मग महिलाराज खरंच असतो का इथे ?

शहरात खराब रस्त्यांमुळे बारा महिने धुळीचे साम्राज्य पसरलेलं असत.अनियमित कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, प्रभागातील शहरातील अस्वच्छता या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी नगरसेवकांची असते. परंतु निवडून आल्यानंतर हे नगरसेवक पाच वर्ष प्रभागात डुंकूनही पाहत नाहीत काहींना तर हा मतदार आपल्या वार्डातील आहे याचीही माहिती नसते पण मत मागताना बरोबर घर शोधतात आणि मत मागायला अगदी सूर्योदयापूर्वीच हजरी लावतात.वर्षानुवर्ष आजी माजी नगरसेवक जनतेच्या प्रभागातील समस्या सोडवण्यापेक्षा नगरपालिकेतील टेंडर घेतलेल्या विकासकाकडून, ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन प्रभागात निकृष्ट कामं करवून घेताना दिसतात बहूतेक नगरसेवक व्यवसाय थाटतात बंगले बांधतात कुठून येतो एवढा पैसा ? हा प्रश्न विचारण्याचं धाडस जनता दाखवत नाही कारणं निवडणुकीच्या वेळी मतदारांना वेगवेगळी आमिष दाखवून, गोड बोलून मत मिळवली जातात.काही मतदारही हजार पाचशे घेऊन या अकार्यक्षम भ्रष्ट उमेदवाराला निवडून देतात.आणि नंतर मग यामुळे मतदारांना स्थानिक प्रश्नांवर, किंवा वयैक्तिक काही काम नगरसेवकाकडे घेऊन जायचं म्हटलं तर तोंड उरत नाही.

तुम्ही पैसे घेतले मतदान केलं झालं तुमच काम हे गृहीतच धरलं जात. त्यामुळे मतदारांनो जागृत राहा घराणेशाही गटा- तटाच्या राजकारणाला फाटा देऊन यांचा भ्रष्टाचार खणून ज्याला आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी तळमळ आहे आवड आहे अशा नवख्या स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्याला संधी देऊन बघा.भलेही त्याच्याकडे पैसे नसतील परंतु तोच कार्यकता तुम्ही संधी दिल्यास तुमच्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहिल.थोड्याफार आमिषाला बळी पडून तुम्ही विकलेल्या मताला काही किंमत राहिल का ? त्यामुळे योग्य उमेदवाराला तुमचं मत दिलं तर तुमच्या मताला किंमत आणि ताकद टिकून योग्य उमेदवार निवडून येऊन स्वच्छ, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त कारभार होण्याची हमी भावी नगरसेवकांकडून बाळगली तर कदाचित निराशा होणार नाही.
✍️ समाधान दणाने, मो.72188 44652 करमाळा जिल्हा-सोलापूर


