26/11 शहीदांना श्रद्धांजली म्हणून करमाळा तालुक्यातील विविध गावात रक्तदान शिबिरांचे आयोजन

करमाळा : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी करमाळा तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच समाजातील रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळावे, हा उद्देश असून सर्व गट, पक्ष आणि करमाळा पोलीस स्टेशन यांच्या वतीने बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील प्रमुख ठिकाणी ही शिबिरे होणार आहेत.

करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे. देशभावना आणि समाजभावना जपण्यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

करमाळा शहर पोलीस ठाणे, केम, कंदर, जेऊर, जिंती, जातेगाव, साडे, सालसे, वाशिंबे चौफुला, कोटी, हिसरे आदी ठिकाणी ही शिबिरे होणार असून, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक कार्यात हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

