26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अडसूळ हॉस्पिटलतर्फे श्रद्धांजली

0

करमाळा (प्रतिनिधी) :  २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना आदरांजली म्हणून अडसूळ हॉस्पिटल, वेताळ पेठ करमाळा यांच्या वतीने काल दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. अडसूळ बोलताना म्हणाले की, 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस भारतीय इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो. आज या भीषण दहशतवादी हल्ल्याला 17 वर्षे पूर्ण झाली. मुंबईतील ताज हॉटेलसह पाच ते सात ठिकाणी एकाचवेळी झालेल्या हल्ल्यांत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. परदेशी पर्यटकांनाही ताज हॉटेलमध्ये ओलीस ठेवण्यात आले होते. ‘मुंबई कधीही थांबत नाही’ या शहरावर झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता.

या संकटसमयी मुंबई पोलिस दलातील जिगरबाज अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांशी लढा देत हल्ला परतवून लावला. या मोहिमेत अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांसह अनेक शूर जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्यामुळे शेकडो निष्पापांचे प्राण वाचले. आजही हा दिवस आठवल्यावर अंगावर शहारे येतात.

या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. सुनील अडसूळ व साधना अडसूळ यांच्या पुढाकारातून राबविण्यात आली. डॉ. अडसूळ यांचे कामटे परिवाराशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि ‘अशोक कामटे विचार मंच’च्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!