शहर विकास आघाडीची छत्री 'चिन्ह' वाटतानाच हजर -

शहर विकास आघाडीची छत्री ‘चिन्ह’ वाटतानाच हजर

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२७:  नगरपरिषद निवडणुकीत सध्या तिरंगी लढतीचा जोर वाढत चालला आहे. एका बाजूला भाजपचे कमळ, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा धनुष्यबाण आणि तिसरीकडे शहर विकास आघाडी—अशी रंगतदार परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप व शिवसेनेची चिन्हे निश्चित असताना, शहर विकास आघाडीला कोणते चिन्ह जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.

काल ( ता.२६) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पक्ष व अपक्षांची चिन्हे जाहीर केली. शहर विकास आघाडीने छत्री हे चिन्ह मागितले होते आणि त्यांना ते मिळाले पण विशेष लक्षवेधी ठरलं ते त्यांच्या तत्परतेचे प्रदर्शन.

चिन्ह मिळताच सावंत गटाचे कार्यकर्ते जणू सज्जच होते. केवळ काही मिनिटांतच छत्रीचे स्टिकर्स, गळ्यात घालायचे गमजे आणि प्रचाराचे साहित्य निवडणूक कार्यालयाच्या बाहेर पोहोचले. यानंतर अवघ्या अर्ध्या तासात हे सर्व साहित्य शहरातील प्रत्येक विभागांत पसरले.इतर पक्षांचे साहित्य अद्याप येत असतानाच शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते मैदानात उतरले होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि संघटनेची जोरदार तयारी स्पष्टपणे दिसून आली.

इतिहासाची पुनरावृत्ती….
सन 1996 मधील निवडणूक आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्या वेळी सावंत गट, जगताप गट आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. नागरिक संघटना आणि भाजप स्वतंत्र रिंगणात होते.
त्या वेळेस सावंत गटाने ज्ञानेश्वर मोरे(भेळवाले)आणि अजीज तांबोळी ( पानवाले) या सामन्य परिवारातील उमेदवारांना संधी दिली होती आणि
निवडणूक छत्री चिन्हावरच  लढवली होती. विशेष म्हणजे—
दोन्ही उमेदवार प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून विजयी झाले होते.
याच पार्श्वभूमीवर यंदाही सावंत गटाने जाणूनबुजून ‘छत्री’चे चिन्ह मागितल्याचे बोलले जात आहे. इतिहासातील यश पुन्हा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!