युनियन बँक चिखलठाण शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन – सामाजिक बांधिलकी जपत परिसराच्या विकासाला बँकेचा हातभार

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : शंभर कोटींची उलाढाल असलेल्या युनियन बँकेच्या चिखलठाण शाखेने केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत परिसराच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन युनियन बँकेचे विभागीय प्रबंधक सुनील कुमार यादव यांनी केले. चिखलठाण (ता. करमाळा) येथील शाखेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन व ग्राहक मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके होते.

यादव पुढे म्हणाले की, गेल्या 38 वर्षांपासून युनियन बँक चिखलठाण परिसरात ग्राहकांना सातत्यपूर्ण सेवा देत आहे. शेतकरी, छोटे उद्योजक, महिला बचत गट यांना उभारी देत शासनाच्या विविध योजना बँकेमार्फत राबविल्या जात आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

क्षेत्रीय उपप्रबंधक सुभाष गजभिये यांनी बँकेच्या आर्थिक सहाय्यामुळे परिसरातील प्रगतीला चालना मिळत असून लोकांमध्ये बचतीची सवयही विकसित होत असल्याचे सांगितले. शाखा व्यवस्थापक अनिल बुटे यांनी प्रास्ताविक केले तर उपव्यवस्थापक सिद्धेश्वर शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे यांनीही भाषणे केली.

या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी करमाळा राजेंद्र नेटके, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचे जिल्हा संसाधन व्याप्ती प्रमुख मनोज बोबडे, पंचायत समिती उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक मनीषा बिचकुळे, मकाईचे संचालक दिनकर सरडे, आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ, तसेच गजेंद्र पोळ, नानासाहेब साळुंके, प्रशांत नाईकनवरे, गंगाधर पोळ, सचिन राशिनकर, विशाल सुरवसे, औदुंबर गाडे, धनाजी ढवळे, वैभव मिसाळ आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


