करमाळा नगरपरिषद 2025 : सन 2016 च्या विरूध्द टोकाची निवडणूक -

करमाळा नगरपरिषद 2025 : सन 2016 च्या विरूध्द टोकाची निवडणूक

0


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२८ : नगरपरिषदेच्या सन 2016 च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्तरीत्या मिळवलेलं भरघोस यश, या निवडणुकीत मात्र पूर्णपणे इतिहासजमा झाल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. आश्चर्य म्हणजे त्या दोन्ही पक्षांचा एकही उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात नाही.

यंदाच्या निवडणुकीत शिवसेना( जगताप गट), भाजपा–देवी गट-बागल गट- संजय शिंदे गट व शहर विकास आघाडी,( सावंत गट) शिवसेना ( ठाकरे गट) अशी लढत होत आहे. या शिवाय राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी आठ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. अशी नवी, टोकाची लढत पाहायला मिळते आहे.
सन 2016 च्या निवडणुकीत जगताप गट काँग्रेसकडून तर बागल गट राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले होते. ‘काँग्रेस–राष्ट्रवादी युती’च्या बळावर वैभवराजे जगताप यांनी शहर विकास आघाडीच्या कन्हैय्यालाल देवी यांचा तब्बल ७८९ मतांनी पराभव केला होता. यानिवडणुकीत भाजपाने पॅनेल उभा केला होता.

त्या निवडणुकीत काँग्रेसला 4, राष्ट्रवादीला 7 शहर विकास आघाडीला 3( सावंत गट), नागरिक संघटनेला 2 तर घुमरे गटाला 1अशा पद्धतीने नगरसेवक निवडून आले होते. तथापि शहर विकास आघाडीला नगराध्यक्षासाठी शिट्टी, तर नगरसेवक पदासाठी रोडरोलर, नारळ अशी वेगवेगळी चिन्हे मिळाल्याने मतांत गोंधळ झाला. तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपा गणेश चिवटे यांना 2338 तर,शिवसेना महेश चिवटे यांना 854, कन्हैयालाल देवी यांना 5363 तर वैभवराजे जगताप यांना 6152 मते मिळाली होती. विरोधीगटातील मतफुटीचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला होता. यावेळी समीकरणे पालटली आहेत.

भाजपा- बागलगट-नागरिक संघटना देवी गट व माजी आमदार संजयमामा शिंदे हे एकत्र आहेत. तर सावंत गट शहर विकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात आहे. त्यांना ठाकरेगट शिवसेना पाठींबा आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) गटाने नगरसेवक पदासाठी ८ उमेदवार उभे केले असून नगराध्यक्षासाठी मात्र त्यांनी भाजपाच्या सुनिता देवी यांना पाठिंबा दिला आहे.

जगताप गटाने यावेळी नेहमीप्रमाणे अन्य गटांचे सहकार्य न घेता, स्वबळावर शिवसेनेच्या चिन्हावर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहीर सभेत भाषण करून पाठबळ दिले आहे. भाजपाने पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जागेवर कमळ चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे, शहर विकास आघाडीत सावंत गट, असंतुष्ट कार्यकर्ते, स्थानिक संघटनांचे कार्यकर्ते व ठाकरे शिवसेना यांचा भक्कम मेळ साधून 20 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.

या तिन्ही गटांमुळे सध्या करमाळ्यात तिरंगी संघर्ष शिगेला पोहोचला आहे.पण ज्या काँग्रेस–राष्ट्रवादीने गेल्या वेळी सत्ता हस्तगत केली. ते काँग्रेस–राष्ट्रवादीचे विजयी चेहरे आज पूर्णपणे अदृश्य झाले आहेत. ना उमेदवार… ना पॅनल… ना लढतीची शक्यता! ही बाब करमाळा राजकारणातील सर्वात मोठी धक्कादायक मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!