एकदा आम्हाला संधी द्या,मग ‘करमाळ्या’चा विकास दाखवतो – सुनील सावंत

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता.१ : मागील अनेक वर्षांपासून विरोधकांकडे सत्ता होती. कुणाकडे ३५ वर्षे तर कुणाकडे ४५ वर्षे सत्ता असूनही करमाळा शहराचा विकास केला गेला नाही. यावेळी आम्हाला सेवेची एक संधी द्या, मग आम्ही करमाळ्याचा विकास कसा असतो हे दाखवून देऊ, असे आवाहन शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुनील सावंत यांनी केले.

शहर विकास आघाडीच्या वतीने करमाळा शहरातील सुभाष चौकात आयोजित सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी जनकसिंग परदेशी होते. पुढे बोलताना श्री. सावंत म्हणाले, “विरोधकांच्या दोन्ही गटांना यापूर्वी आपण सत्ता दिली. परंतु दोघांनीही सत्ता मिळवून फक्त स्वतःचा मेवा खाण्याचे काम केले; शहराच्या विकासाकडे कोणाचेही लक्ष नव्हते. करमाळा शहराचा खरा विकास पाहायचा असेल तर यावेळी शहर विकास आघाडीला विजयी करा.” विरोधकांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. मोहिनी सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले, “शहरातील महिलांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून घराघरांत धूळ जाते. गटारींचे प्रश्न, मुलांच्या शिक्षणातील अडचणी – हे सर्व प्रश्न मी नक्की सोडवणार आहे. त्यासाठी आपला आशीर्वाद व साथ आवश्यक आहे.” या सभेत हनुमंत मांढरे पाटील, संजय उर्फ पप्पू अण्णा सावंत तसेच किल्ला विभागातील प्रियांका गायकवाड आदिंनीही भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लोंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. मोरे यांनी केले. या सभेला श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. शहर विकास आघाडीने काढलेल्या रॅलीतून निर्माण झालेली हवा या सभेतही स्पष्टपणे जाणवली.


