बालविवाहमुक्त भारतासाठी केंद्र सरकारची १०० दिवसांची जागरुकता मोहीम सुरू – महात्मा फुले समाज सेवा मंडळचा सक्रियपणे सहभाग

करमाळा: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जागरुकता मोहीम नुकतीच सुरू झाली आहे. या मोहिमेमध्ये करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळचा सक्रियपणे सहभाग असून या मोहिमेच्या यशासाठी सर्व सरकारी विभाग व स्थानिक प्रशासनाशी घनिष्ठ समन्वय साधून काम करण्याचा निर्धार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते २९ नोव्हेंबरला या मोहिमेचा शुभारंभ झाला. या मोहिमेमार्फत बालविवाहास खतपाणी घालणारी संपूर्ण सामाजिक-पारिस्थितिक व्यवस्था मोडीत काढण्याचा केंद्राचा मानस आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यात “स्पष्ट धोरणे आणि गावागावापर्यंत पोहोचणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारत बालविवाह निर्मूलनाकडे जलदगतीने वाटचाल करीत आहे,” असे सांगितले होते.

केंद्र सरकारतर्फे राज्यांना पाठवलेल्या अधिसूचनेनुसार मोहिमेला व्यापक आणि दृश्यमान स्वरूप देण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय तसेच शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांना सक्रिय योगदानाचा आदेश देण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी सातत्याने काम करणाऱ्या महात्मा फुले समाज सेवा मंडळ करमाळाचे प्रमुख प्रमोद झिंजाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या सहकार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “बालविवाह निर्मूलनासाठी प्रशासन कठोर प्रयत्न करत आहे. प्रशासनाशी घनिष्ठ समन्वय साधत काम केल्यामुळेच आमच्या कार्याला बळ मिळाले आहे. देशाचे सर्वोच्च नेतृत्व या उद्दिष्टासाठी कटीबद्ध असल्याने २०३० पूर्वी भारत निश्चितच बालविवाहमुक्त होईल, असा विश्वास आम्हाला आहे.”

