हुंड्यासाठी विवाहितेचा छळ – सासरचे लोकांवर गुन्हा दाखल…

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१३ : हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी सासरच्या लोकांविरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी सौ. अनुष्का अजय वाघ (वय १९, मूळ रा. अकोले ता. इंदापूर जि. पुणे, सध्या रा. चिखलठाण नं. २ ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
त्या फिर्यादीनुसार सौ. अनुष्का यांचा विवाह सन २०२५ मध्ये अजय रामचंद्र वाघ यांच्याशी झाला. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस नीट नांदवल्यानंतर पती, सासू व इतर नातेवाईकांकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोल्ट्री फार्म व ट्रॅक्टर डंपिंग ट्रॉलीसाठी वारंवार पैशांची मागणी करण्यात आली. या मागणीपोटी माहेरकडून एकूण ३ लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तरीही छळ थांबला नसून उपाशी ठेवणे, शिळे अन्न देणे, मारहाण करणे तसेच जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे. दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी मारहाण करून घरातून हाकलून दिले व माहेरून ३ लाख रुपये आणल्याशिवाय नांदू देणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी अंगावरील दागिनेही काढून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर बारामती पोलीस ठाण्यातील समुपदेशन केंद्रात तक्रार दिल्यानंतरही सासरच्या लोकांकडून कोणताही बदल न झाल्याने सध्या त्या माहेरी राहत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.



