कुणबी दाखल्यांतील अडथळ्यांबाबत ‘सकल मराठा समाज’कडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

करमाळा:कुर्डूवाडी प्रांत कार्यालयाकडून कुणबी समाजाचे दाखले जाणीवपूर्वक अडवले जात असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज, करमाळा यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार निवेदन सादर केले आहे. दाखले प्रक्रियेत सुरळीतता आणावी, अन्यथा १ जानेवारी २०२६ रोजी सोलापूर कलेक्टर कार्यालय व कुर्डूवाडी प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, अर्जदाराने प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केलेली असताना ‘सेल्फ अटेस्टेड’ची अनावश्यक मागणी करून प्रकरणे अडवली जात आहेत. एकाच कुटुंबातील एका प्रकरणाला तहसीलदार प्रमाणित प्रत ग्राह्य धरली जात असताना, दुसऱ्या प्रकरणात मूळ कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच कुटुंबात जुने जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असतानाही त्याला महत्व न देता प्रकरणे बाजूला ठेवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. महसुली पुरावे असूनही अनावश्यक फेरफारांची मागणी करून विलंब केला जात असल्याचा आरोपही निवेदनात आहे.

करमाळा तहसील कार्यालयातून कुर्डूवाडी प्रांत कार्यालयाकडे गेलेली व त्रुटी दाखवून परत आलेली प्रकरणे फेरसादरीकरणाच्या वेळी तहसीलदारांच्या स्वाक्षरीसह करमाळ्यातच ऑनलाइन स्वीकारावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व बाबींवर तातडीने संबंधितांना सूचना द्याव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका सकल मराठा समाज करमाळा यांनी मांडली आहे.


