जबाबदारीचं झाड…

सावली देणारं, फळ देणारं जस झाड असत तसच जबाबदारी अंगाखांद्यावर घेऊन जबाबदारी सांभाळणारही झाड असतं…
काही व्यक्ती जन्माला येतानाच जबाबदारीच ओझं घेऊन जन्माला येतात.ते त्या जबाबदारी निभावत जगतात. ते त्याला कंटाळत नाहीत, चिडत नाहीत, आणि थकतही नाहीत. ते स्वतःपेक्षा कुटुंब आणि समाज याला प्राधान्य देतात. अशाच दुर्मिळ, निष्ठावान आणि सेवाव्रती व्यक्तिमत्त्वांपैकी करमाळा शहरातील आदरणीय नाव म्हणजे ललित लक्ष्मीनारायण अग्रवाल (भैय्या) यांचे आहे.

लहान वयातच त्यांच्यावर कुटुंबाची व व्यवसायाची जबाबदारी पडली.तीन बहिणी, तीन भाऊ असा मोठा परिवार या सगळ्यांची काळजी व जबाबदारी घेताना दहावीनंतर शिक्षण घेता आले नाही. पण त्यांचे अनुभवाचे शिक्षण एवढे मोठे आहे की, ते विद्यापीठाच्या डिग्रीला लाजवेल असे आहे. त्यांच्याकडे असलेले शहाणपण, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण वाखणण्यासारखे आहे.
वडील स्व. लक्ष्मीनारायण अग्रवाल यांचे संघटन, धर्मकार्य आणि समाजकार्याचे संस्कार भैय्यांना लहानपणापासूनच लाभले.
त्याच प्रेरणेतून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले आणि संघचालक पदापर्यंत निष्ठेने कार्य केले.

सोलापूर जिल्ह्यात संघामार्फत आयोजित “हेमंत शिबिर” हे त्यांच्या संघटनकौशल्याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे.
त्यांच्यासोबत काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता आजही त्यांना विश्वासाने, आदराने आणि अभिमानाने पाहतो.
स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष,आर्थिक क्षेत्रात लालकृष्ण अडवणी पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन,राजकीय क्षेत्रात भाजपा नगरसेवक म्हणून केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. या प्रत्येक भूमिकेत त्यांनी पदापेक्षा काम महत्त्वाचे मानले. सन 1991–92 मध्ये श्रीराम जन्मभूमी आंदोलनात अयोध्येत ‘कारसेवक’ म्हणून त्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

वैयक्तिक आयुष्यात तीन वेळा गंभीर अपघात होऊनही, खचून न जाता, योगाच्या माध्यमातून आरोग्य सांभाळत आजही ते सक्रिय आहेत. एवढेच नव्हेतर पतंजली योग समितीचे तालुका अध्यक्ष म्हणून
आरोग्य जनजागृतीचे कार्य करत आहेत. कोविड काळात पोलीस बांधवांसाठी मोफत भोजन व्यवस्था केली. अंमळनेरकर महाराज, गजानन महाराज,शनेश्वर दिंडी यांची दर वर्षी सेवा व भोजन व्यवस्था पार पाडतात तर सर्वात मोठी निवृत्ती महाराज दिंडी सोहळ्यांचे व्यवस्थापन आणि सेवा त्यात ते सक्रिय असतात.
त्यांनी गुळसडी येथे माळरान शेती खरेदी करून ती जमीन आधुनिक व शाश्वत उभी केली. त्यामुळेच त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते मिळाला.

आज त्यांच्या तिन्ही मुलांनी स्वतःच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगदीश अग्रवाल हे भाजपाचे शहराध्यक्ष, ॲड.प्रियाल अग्रवाल हे वकील व सामाजिक कार्यात सक्रिय,
तर श्रीकांत अग्रवाल हॉटेल व्यवसायात कार्यरत आहेत.
या सर्व कार्यात त्यांच्या पाठीशी धर्मपत्नी सौ. राजमती ताईंची भक्कम, संयमी आणि प्रेरणादायी साथ आहे. त्यांचे बंधु उमेश अग्रवाल हे व्यवसायात रममाण आहेत तर दुसरे बंधू स्व.महेश अग्रवाल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या परिवाराची जबाबदारीही
भैय्यांनी स्वीकारली आहे. आज वय, जबाबदाऱ्या किंवा अनुभवाचा भार त्यांच्या उत्साहावर मात करू शकत नाही. ते आजही सर्वकार्यात आघाडीवर आहेत.
अशा या कर्तृत्ववान, सेवाभावी, निष्ठावान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वासवाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…!
– डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे, करमाळा.मो.न 9011355389
