तडीपार असलेला इसमास जेऊर येथे अटक

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१८: महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 अन्वये सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला इसम उमेश राजाराम ऊर्फ राजेंद्र गलांडे (वय 31, रा. चिखलठाण नं. 01, ता. करमाळा, जि. सोलापूर) हा तडीपार आदेशाचा भंग करून जेऊर परिसरात फिरत असल्याचे आढळून आला. दि. 15 डिसेंबर 2025 रोजी पोलीसांना सदर तडीपार इसम जेऊर येथे दहशत निर्माण करत फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे, पो.का. कोपनर, पो.का. काटे यांच्यासह पोलीस पथकाने कारवाई करत जेऊर येथील रेल्वे बोगद्याजवळ सदर इसमास ताब्यात घेतले.
तपासादरम्यान सदर इसमाने तडीपार आदेशाविरुद्ध अपील दाखल केल्याचे सांगितले, मात्र आदेश रद्द झालेला नसून कोणताही स्थगिती आदेश (स्टे) नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तडीपार आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.




