करमाळ्याच्या वैष्णवी पाटील ची धनुर्विद्या राष्ट्रीय स्तरावर

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.20: अमरावती येथे 19 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या शालेय राज्यस्तरीय कंपाउंड आर्चरी स्पर्धेत करमाळा तालुक्याच्या वरकुटे (मु.) गावातील वैष्णवी पाटील व जयहिंद जगताप या दोन्ही खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली असून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

वैष्णवी पाटील हिने 19 वर्ष वयोगटातील कंपाउंड आर्चरी प्रकारात तब्बल चार सुवर्णपदके पटकावत करमाळा तालुक्याचे नाव थेट राष्ट्रीय पातळीवर उज्वल केले आहे. विशेष म्हणजे वैष्णवीची ही सलग चौथ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड असून यापूर्वी तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सहभाग नोंदवला आहे. कोल्हापूर विभागातून सहभागी झालेली वैष्णवी सध्या सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. तिचा दैनंदिन सराव दृष्टी आर्चरी अकॅडमी, सातारा येथे प्रवीण सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, प्रशिक्षक व खेळाडू यांच्या अथक मेहनतीचे हे यशस्वी फलित आहे.
तर जयहिंद जगताप याने 17 वर्षाखालील वयोगटात दोन सुवर्ण व एक कांस्य पदक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली असून रांची (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. गेल्या वर्षीदेखील जयहिंदने राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत वर्चस्व गाजवले होते. सध्या तो वाशिंबे येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून, करमाळा येथेच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक सराव करत आहे.

या दोन्ही होतकरू खेळाडूंच्या दैदीप्यमान यशामुळे करमाळा तालुक्याचे नाव क्रीडाक्षेत्रात उजळून निघाले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


