विट येथे तरुणाला बेदम मारहाण – इंस्टाग्राम वरून झालेल्या ओळखीचा परिणाम

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२३: विट येथे २२ वर्षाच्या तरुणास लाथाबुक्क्यांनी व रबरी पाईपने मारहाण केल्याची घटना २० डिसेंबर ला दुपारी १ वाजता घडली आहे. जखमी तरुणावर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


यात हकीकत अशी की, नान्नज, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील २२ वर्षाच्या तरुणाची वीट येथील विवाहितेशी इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली होती. सुमारे एक महिन्यापासून दोघांमध्ये मोबाईलवरून संवाद सुरू होता.
दि. २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विवाहितेने त्याला भेटीसाठी बोलावल्याने तो वीट येथे आला होता. संबधीत महीलेच्या घरासमोर उभा असताना एका इसम त्याच्याकडे आला व म्हणाला “माझ्या घरासमोर येऊन माझ्या पत्नीची छेड काढतोस काय?” असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. त्याचवेळी आणखी दोन इसम घटनास्थळी आले, त्यांनी रबरी पाईपने या तरुणाच्या डोक्यावर, पाठीवर व तोंडावर मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला.

त्यानंतर
संध्याकाळी ६ वाजता या तरुणाने घडलेला प्रकार आपल्या गावातील नातेवाईकांना कळविला. त्यानंतर त्याचे चुलत भाऊ वीट येथे आले व त्यांनी त्याला चारचाकी वाहनातून आणून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणात पोलीसांनी तिघांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

