संगमेश्वर विद्यालयात ‘मी अनुभवलेला महापूर’ निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

करमाळा, ता.२४: श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा येथे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी व त्यांच्या अनुभवांना शब्दरूप देता यावे, या उद्देशाने ‘मी अनुभवलेला महापूर’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज उत्साहात पार पडला.

या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक व गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
या समारंभासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे-पाटील, मनसे अध्यक्ष संजय बापू घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटण संतोष वारे, बोरगावचे सरपंच व संस्थेचे सहसचिव विनय ननवरे, ग्राहक पंचायत चे अॅड. शशिकांत नरूटे, निलज गावच्या पोलीस पाटील चित्राताई राऊत, आदिनाथ देवस्थानचे पुजारी गहिनीनाथ बप्पा गायकवाड, स्पर्धेचे आयोजक अशोक गोफने आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक रणजीत माने, गणेशभाऊ करे पाटील, संजय बापू घोलप व संतोष वारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपत्तीच्या प्रसंगी धैर्य, शिस्त व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या लेखनातून व्यक्त केलेले अनुभव कौतुकास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण भागडे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी मानले.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला चालना मिळाल्याने पालक व ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.


