जनतेला हतबल, भयभीत व लाचार करण्याचा प्रयत्न सुरू – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा,ता.२४:बायपास–माळेवाडी–निलजरोड या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे उद् घाटन काल (ता.२३) माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी सध्याच्या परिस्थितीवर जोरदार भाष्य करत, “सामान्य जनतेला हतबल, भयभीत व लाचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा गंभीर आरोप केला.शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून, परदेशातून शेतमाल आयात केला जात असल्यामुळे देशातील उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. “उत्पादन खर्चाशी निगडित बाजारभाव मिळणे ही काळाची गरज आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा अभाव अधोरेखित करताना त्यांनी रस्ते, पाणी व वीज या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे सांगितले. “रस्ते चांगले झाले की दळणवळण वाढते आणि त्यातूनच विकासाची प्रक्रिया सुरू होते,” असे नमूद करत तालुक्यात वाढत असलेल्या फळबागांसाठी चांगल्या रस्त्यांची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी स्पष्ट केले.

या रस्त्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देत, १२ फूट डांबरीकरणासह साईड पट्या असलेला मजबूत रस्ता तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, “रस्ते मंजूर होतात, पण ठेकेदाराने दर्जेदार काम केले पाहिजे. निकृष्ट काम होता कामा नये. कारण हा पैसा जनतेच्या करातून आलेला आहे,” असे सांगत जनतेनेही कामावर लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
“बाभळीच्या बिया पेरून आंबे येत नाहीत,” या मार्मिक उदाहरणातून योग्य माणसांची निवड झाली तरच विकास व न्याय मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पोथरे व माळेवाडी परिसरातील नागरिकांनी विकासाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास भरपूर विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस भूमिपूजन व साहित्य पूजन करण्यात आले. माळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्री.जगताप यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब झिंजाडे यांनी केले. पोथरे गावचे सरपंच अंकुश शिंदे यांनी मनोगतात रस्त्याचे काम इस्टिमेटप्रमाणे व दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास माळेवाडी, डोंगरी आई वस्ती, जाधव वस्ती, घारगाव वस्ती, तुळशीराम झिंजाडे वस्ती, खंडोबा वस्ती, शिंदे वस्ती आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

