कायद्याच्या भीतीपोटी मुलांकडे दुर्लक्ष नको; माझ्या मुलाला आदर्श नागरिक घडवा – पालकांचे मुख्याध्यापिकेस पत्र

केम(संजय जाधव) : लाल बहादूर शास्त्री विद्यालय, सालसे येथे इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या जयप्रकाश विजयकुमार गुंड या विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेस लिहिलेल्या पत्रामुळे सध्या शिक्षण क्षेत्रात शिस्त, संस्कार आणि शिक्षकांचे अधिकार याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा सुरू झाली आहे.

दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शिक्षकांनी अध्यापन करताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मानसिक अथवा शारीरिक इजा करू नये, अपमानकारक वक्तव्य टाळावे, रागावू नये, कान ओढणे, उठाबशा काढायला लावणे, अभ्यासासाठी शिक्षा देणे यांसारख्या बाबींवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे बालहक्क आणि संरक्षण या दृष्टीने हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असला, तरी त्याचा अतिरेकी अर्थ लावल्यास विद्यार्थ्यांना शिस्त व संस्कार लावणे कठीण होईल, अशी चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
या शासन निर्णयाच्या आधारे शाळा व्यवस्थापन किंवा पालकांकडून शिक्षकांवर आरोप होण्याची शक्यता वाढल्याने, स्वतःच्या सुरक्षेसाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या चुका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतील, अशी भीती निर्माण झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व नैतिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याच पार्श्वभूमीवर जयप्रकाश गुंड यांच्या पालकांनी मुख्याध्यापिकेस लिहिलेल्या पत्रात, “माझ्या मुलास घडवताना शिक्षकांनी कोणत्याही कायद्याचा अवास्तव धाक बाळगू नये. माझ्या मुलाच्या बाबतीत मी कोणतीही तक्रार करणार नाही,” असे स्पष्टपणे नमूद केले आहे. वाढत्या वयात सध्याची सामाजिक परिस्थिती आणि मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मुलांमध्ये होत असलेले नकारात्मक बदल लक्षात घेता, आज संस्कारांची नितांत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, शिक्षक केवळ विषय शिकवणारे न राहता आई-वडिलांप्रमाणे विद्यार्थ्यांना वळण लावणारे मार्गदर्शक झाले पाहिजेत. अपूर्ण अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी सौम्य शिक्षा देणे, प्रसंगी कठोर शब्दांत समज देणे किंवा रागावणे या गोष्टी शिक्षकांनी निर्धास्तपणे कराव्यात, अशी लेखी विनंती पालकांनी केली आहे.

तसेच, विद्यार्थ्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचे मनापासून कौतुक करावे, त्यांना भावनिक आधार द्यावा आणि मातृ-पितृ हृदयाने जवळ घ्यावे, असे भावनिक आवाहनही या पत्रात करण्यात आले आहे.
या पत्रामुळे शिक्षकांना विद्यार्थी घडवताना आवश्यक असलेल्या अधिकारांबाबत व स्वातंत्र्याबाबतचा मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत इतर पालकांचे मतभेद असू शकतात; मात्र या पालकांनी दाखवलेल्या विश्वासपूर्ण भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

