करमाळा नगर परिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदाच्या रासप उमेदवाराची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.27:
नगर परिषदेच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. भावना भद्रेश गांधी यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत त्यांनी मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली असून, विशेषतः ईव्हीएम मशीनच्या प्रोग्रामिंग व स्ट्रक्चरबाबत संशय व्यक्त केला आहे. अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असतानाही अपेक्षेपेक्षा अत्यल्प मते मिळाल्याने ही शंका अधिक बळावली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
सौ. गांधी यांनी तक्रारीत ईव्हीएम मशीनचा प्रोग्राम कोड व अल्गोरिदम (Algorithm) सार्वजनिक करावा, तसेच संबंधित मशीनचे तांत्रिक स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याशिवाय, मतदानानंतर व मतमोजणीपूर्वी ज्या कालावधीत ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या, त्या संपूर्ण कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे, अशीही ठाम मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद या मागणीवर नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे करमाळा शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.


