अमृता उद्योग समूहाची गरुडझेप : विस्तारित प्रकल्पाचे  उद् घाटन -

अमृता उद्योग समूहाची गरुडझेप : विस्तारित प्रकल्पाचे  उद् घाटन

0

करमाळा/ दादासाहेब झिंजाडे याजकडून
करमाळा ता.२८:पोथरे (ता. करमाळा) येथे अमृता उद्योग समूहाने अल्पावधीत केलेली प्रगती ही ग्रामीण उद्योजकतेची प्रेरणादायी कहाणी ठरत आहे. सन २०२३ मध्ये अत्यंत छोटेखानी स्वरूपात सुरू झालेला अमृता उद्योग समूह अवघ्या दोन-तीन वर्षांतच भरभराटीस आला असून, आज हा उद्योग महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक लहान-मोठ्या शहरांपर्यंत पोहोचला आहे.

अमृता उद्योग समूहामार्फत पापड, नाचणी पापडी, तांदूळ पापडी, शेवई, वडे आदी पारंपरिक खाद्यपदार्थांची निर्मिती करण्यात येते. वाढती मागणी आणि मर्यादित उत्पादनक्षमता लक्षात घेता उद्योगाच्या विस्तारित प्रकल्पाचे उद् घाटन  भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश  चिवटे , कु. अमृता विकास आढाव व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.

या उद् घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना गणेश चिवटे म्हणाले की, “अमृता उद्योग समूहाने अल्पावधीतच आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली असून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला दर्जेदार माल हीच त्यांची खरी ताकद आहे. सातत्य, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा जपला तर कोणताही उद्योग निश्चितच भरभराटीस येतो. आजचा हा विस्तारित प्रकल्प म्हणजे अमृता उद्योग समूहाची गरुडझेप आहे.”
‘उमेद’ अभियानाचे व्यवस्थापक श्री. योगेश जगताप यांनी सांगितले की, अमृता पापड उद्योगाला यापूर्वीही ‘उमेद’कडून सहकार्य करण्यात आले असून भविष्यातही कोणतीही अडचण आल्यास ‘उमेद’ची संपूर्ण टीम पाठबळ देईल. ग्रामीण भागातील उद्योगांना सक्षम करण्यासाठी ‘उमेद’ सदैव कटिबद्ध आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांनी महिलांच्या वाढत्या सहभागावर प्रकाश टाकत सांगितले की, कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अमृता उद्योग उभा राहिला आहे. आज महिला उद्योजिका, नगराध्यक्षा म्हणून विविध क्षेत्रात आघाडी घेत आहेत. सौ. उषाताई आढाव व  परिवार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
शिवरत्न ग्रुपचे अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे यांनी ग्रामीण भागातील बदलते चित्र अधोरेखित करत सांगितले की, पूर्वी खेड्यांत मोजकेच व्यवसाय होते; मात्र कै. देवराव आढाव व दत्तात्रय आढाव यांच्या काळापासून आढाव परिवारात व्यावसायिक परंपरा रुजलेली आहे. सौ. उषा व श्री. विकास आढाव यांनी तीन वर्षांपूर्वी केलेली छोटी सुरुवात आज भक्कम उद्योगात रूपांतरित झाली आहे.
पोलीस पाटील  संदीप पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने उद्योगांना चालना मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, बदल स्वीकारण्याची तयारी आणि निष्ठावान प्रयत्न यामुळे उद्योग निश्चितच यशस्वी होतो. आज महिला चूल-मूल यांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.

या उद् घाटन समारंभास ‘उमेद’ अभियानाचे श्री. योगेश जगताप, सौ. सुषमा बिचकुले, अविनाश शेवाळे, कृषी विभागाचे मनोज बोबडे, महावीर नरसाळे, सुनील गायकवाड, मंगेश भांडवलदार, ह.भ.प. डॉ. जेष्ठ वकील बाबुराव हिरडे, परमेश्वर राठोड, नवनिर्वाचित नगरसेवक संजय सावंत, अमित त्रिगुणे, बँक ऑफ महाराष्ट्रचा सर्व कर्मचारी वर्ग, भाजप तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, सोमनाथ झिंजाडे, संकेत झिंजाडे, भाऊसाहेब झिंजाडे तसेच महिला बचत गटांच्या बहुसंख्य महिला व सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. मृदंगाचार्य नानासाहेब पठाडे यांनी प्रभावीपणे केले. ग्रामस्थ व पाहुण्यांच्या मोठ्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला व आभारप्रदर्शनाने समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!